भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालीय. यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालीय. यावर्षी एकूण 119 पद्म पुरस्कारांची घोषणा झालीय. यात 29 महिलांचाही समावेश आहे. याशिवाय 10 परदेशी नागरिक, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार आणि एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्ती
- रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)
- परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)
- नामेदव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य)
- जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय)
- गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)
- सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)
रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)
रजनीकांत देविदास श्रॉफ हे एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. राजू श्रॉफ या नावाने ते ओळखले जातात. ते फॉस्फरस लिमिटेड या केमिकल कंपनीचे संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार ते भारतातील 87 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोदन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
जसवंती जमनादास पोपट
जसवंती जमनादास पोपट या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लिज्जत पापडच्या संस्थापक आहेत. मुंबईच्या रहिवासी असलेल्या जसवंती जमनादास पोपट यांनी आपलं घर चालवण्यासाठी उत्पन्नाचं साधन म्हणून 1959 मध्ये पापड लाटण्याचं काम सुरु केलं. जसवंती बेन गरीब कुटुंबातून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचं शिक्षण देखील कमी होतं. मात्र त्यांच्यातील व्यवहार ज्ञान आणि व्यापाराची समज चांगली होती. त्यातूनच त्यांनी आपल्या या कामात आणखी 6 गरीब बेरोजगार महिलांच्याही हाताला काम दिलं. त्यावेळी त्यांनी 80 रुपये कर्ज काढून हा व्यवसाय सुरु केला. 15 मार्च 1959 रोजी त्यांनी लिज्जत पापडचा व्यवसाय सुरु केला. आज त्यांचा हा व्यवसाय संपूर्ण भारतात पसरला असून त्यांनी हजारो लोकांना रोजगार दिलाय. यात महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)
महाराष्ट्रातील 6 जणांपैकी दोघे सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आहेत. यात एक म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ त्यांच्या अनाथ मुलांसाठी केलेल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना अनाथांची आई असंही संबोधलं जातं.
सिंधुताई यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 मध्ये त्यांनी पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ही संस्था सुरु केली. त्यांनी त्यांची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदनमध्ये दाखल केले आणि इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
या संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही मार्गदर्शनही दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींच्या विवाहासाठी देखील ही संस्था पुढाकार घेते. आतापर्यंत या संस्थेत अशी सुमारे 1050 मुले राहिलेली आहेत.