सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या चारचाकी गाडीतील एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरडफडत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून पसार झाले. या घटनेमुळं दौंड हादरलं आहे. देवदर्शनासाठी जाणारे हे लोक चहा पिण्यासाठी थांबले असताना ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (३० जून) रोजी काहीजणं पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चारचाकीनं पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीतील लोक चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती याठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यांमध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील १ लाख ५० हजाराचे दागिने लुटले. त्यानंतर त्यातील एकानं एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात फरपटत नेऊन तिच्याबरोबर बलात्कार केला. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
या घटनेने दौंड तालुकाच हादरला असून दौंड तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हा प्रकार घडल्याचा समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, नारायण देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.