Sunday, August 10, 2025
HomeMain Newsदुःखद; 16 कोटींच्या लसीनंतरही वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी

दुःखद; 16 कोटींच्या लसीनंतरही वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी

अखेर पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार वेदिकाला झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. आई-वडिलांनी यासाठी लोकासहभागासाठी आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आले होते. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 15 जूनला तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी ही दुःखद बातमी आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेदिकाच्या शरीरातील हालचाली या फेब्रुवारी महिन्यात नैसर्गिकरित्या होत नसल्याचे दिसून आले होते. म्हणून डॉक्टरांचा तिच्या आई-वडिलांनी सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवे असेल, तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचे समजले. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते, तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.

पण वेदिकाच्या आई-वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी 16 कोटी रुपयांसाठी समाजाकडे मदतीची हाक दिली. बघता-बघता पैसे जमा होऊ लागले. आई-वडिलांनी महाराष्ट्र पिंजून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर जून महिन्यात 16 कोटी उभे राहिले. अमेरिकेहून झोलगेन्स्मा लस ही आली. 15 जूनला ती लस वेदीकाला देण्यात आल्यानंतर तिचे शरीर लसीला साथ देऊ लागले, सकारात्मक हालचाली दिसू लागल्या. सगळे काही सुरळीत होताना दिसू लागले असतानाच गेल्या काही दिवसांत तिची तब्येत पुन्हा खालावू लागली.

त्यात 31 जुलैला पुन्हा सुधारणा झाली, रविवारी दुपारपर्यंत देखील ती चांगला प्रतिसाद देत होती. तिच्या नावाने फेसबुकवर असलेल्या पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करत तशी माहितीही देण्यात आली. तिचे वडील सौरभ शिंदेंनी फेसबुकवर स्टेटस ठेवत हितचिंतकांना कळवले. पण त्यानंतर अचानक वेदिकाची तब्येत खालावली अन तिने जगाचा निरोप घेतला. गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, पण रविवारी तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ही दुःखद बातमी येताच देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments