तांबवे गावचे धुरंधर नेतृत्व, स्वा. सै. स्व. आण्णा बाळा पाटील यांचे तांबवे येथील घर पावसामुळे मंगळवारी (दि. 7) पडले. आण्णा बाळा उर्फ भाऊंचे 1992 साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ. सिताबाई या घरात राहत होत्या. मात्र, त्यांच्या निधनानंतर घरात कोणीही नव्हते. बंद अवस्थेत असणार्या या घराने अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवले. मात्र, यंदाच्या संततधार पावसामुळे घरांच्या भिंती ओल्या झाल्या (उरकमल्या)होत्या. अखेर त्या भिंतीनी मान टाकली आणि भाऊंचे घर पडले.
आण्णा बाळा उर्फ भाऊ यांचा दरारा, धडाडी आणि त्यांचा संपर्क जबरदस्त होता. त्याकाळी राज्याचे राजकारण पश्मिच महाराष्ट्रातील स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशा नेतृत्वाकडे होते. त्यांच्याशी भाऊंचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे आण्णा बाळांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आण्णा बाळांना अपत्य नसल्याने त्यांनी स्वत:ला मिळणारी स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन तांबवे गावच्या यशवंत एज्युकेशन सोसायटीच्या तत्कालिन न्यू इंग्लिश स्कूलला दिली. त्यांच्या निधनांतर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेने हायस्कूलला त्यांचे नाव द्यायचे ठरविले आणि त्यानुसार मान्यवर मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत स्वा. सै. स्व. आण्णा बाळा पाटील विद्यालय, असा नामकरण सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमात स्व. आण्णा बाळांच्या पत्नी सिताबाई पाटील यांनाही मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. दोन्ही उभयतांच्या निधनांनतर आण्णा बाळांचे घर रिकामे होते. दरम्यानच्या काळात उत्सुकतेपोटी अनेक लोक आण्णा बाळांचे घर पाहण्यासाठी यायचे. आण्णा बाळा हयात नव्हते, परंतु, त्यांचे घर पाहूनच लोक समाधान मानायचे. त्या घराचे फोटो घ्यायचे. अलिकडच्या मोबाईलच्या जमान्यात लोक सेल्फी काढायचे. मातीचे आणि कौलारू असलेल्या या घराने अनेक वर्षे उन्हाळे, पावसाळे अनुवभवले. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात घरांच्या भिंती ढासळल्या आणि स्व. आण्णा बाळांच्या निवासस्थानाची अखेर पडझड झाली. आता यापुढे आण्णा बाळांचे घरही पहायला मिळणार नाही, याची खंत दूरवरून येणार्या लोकांना नक्कीच राहिल.