Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रतळोजा कारागृहात अन्न घोटाळा?

तळोजा कारागृहात अन्न घोटाळा?

तुरुंगातील कैद्यांना डाळ-भात असं साधं जेवण दिलं जातं. याला काही व्हीआयपी कैदी अपवाद असतात. संगनमताने व्हीआयपी कैद्यांना स्पेशल जेवण दिलं जात असल्याचा अनेकदा आरोप झाला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांना पैसे देऊन कैद्यांना हव्या त्या गोष्टी मिळतात, असा आरोपही केला जातो. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतल्या तळोजा जेलमध्ये घडत असल्याचं समोर आलं आहे. कारागृहातील ‘व्हीआयपी फूड मेन्यू’ व्हायरल झाला आहे.  यात चक्क 8 हजार रुपयांना मटण मसाला, 1500 रुपयांत हैदराबाद बिर्याणी, 2 हजार रुपयांत फ्राईड चिकन, 7000 हजार रुपयांची मटण करी दिली जाते.

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि पेशाने वकील असलेले सुरेंद्र गाडलिंग यांनी तुरुंगात Food Corruption सुरु असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडेही केली आहे.  यानंतर या घोटाळ्याचा तपास सुरु झाला आहे. सामान्य कैद्यांना कारागृहात व्यवस्थित जेवण मिळत नसल्याचा आरोप होत असताना व्हीआयपी कैद्यांना मात्र पैसे घेऊन चिकन, मटण, चायनिज फूड दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

News 18 च्या  रिपोर्टनुसार सुरेंद्र गाडलिंग यांनी नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहातील जेलर सुनील पाटील यांच्या विरोधात 30 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कारागृहातील व्हीआयपी मेन्यूचा रेट देण्यात आला आहे. गाडलिंग यांनी केलेल्या आरोपानुसार कारागृहातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पदार्थ्यांचे वाट्टेल तो रेट निश्चित केला आहे. यात फ्राईड चिकन 2000 रुपये, हैदराबादी बिर्याणी 1500 रुपये, शेजवान राईस 500 रुपये, कोळंबी बिर्याणी 2000 रुपये, चिकन मसाला1000 रुपये, चिकन मिर्च 1500 रुपये, मटन करी 7000 रुपये, मंच्युरिअन चिकन 1500 रुपये, मटन मसाला 8000 रुपये, व्हजे मंच्युरिअन 1000 रुपये, व्हिज बिर्याणी 1000 रुपये, अंडा बिर्याणी 500 रुपये आणि स्पेशल व्हेज पकोडाचे 1000 रुपये रेट लावण्यात आले आहेत.

सुरेंद्र गाडलिंग यांनी केलेल्या तक्रारीत व्हिआयपी कैद्यांना देण्यात येणाऱ्या मेन्यूचं रेट कार्ड दररोज बदलतं. दररोज नवीन रेट कार्ड सकाळी 5.30 ते सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान व्हिआयपी कैद्यांना दिलं जातं. व्हिआयपी फूडचे पैसे रोख पद्धतीने घेतले जातात. यासाठी व्हिआयपी कैद्यांनी कारागृहाबाहेर आपले एजंट नेमले असून ते कारागृहा अधिकाऱ्यांशी बोलतात. या रकमेत 40 टक्के हिस्सा हा कारागृह अधिकाऱ्यांचा असतो. तर इतर वाटा कमिशन एजंट आणि व्हीआयपी कैद्यांसाठी जेवण घेऊन येणाऱ्या लोकांचा असतो, असा आरोप गाडलिंग यांनी केला आहे.

नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात अनेक व्हिआयपी कैदी ठेवण्यात आले आहेत. यात आमदार गणपत गायकवाड यांचा ही समावेश आहे. व्हिआयपी कैद्यांना खूश ठेवण्याचा फटका सामान्य कैद्यांना सहन करावा लागतो. सामान्य आणि गरीब कैद्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याचा आरोपही गाडलिंग यांनी केला आहे.

तळोजा कारागृहाचे जेलर सुनील पाटील यांच्यावर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भीमा कोरेगाव प्रकरणात कैदेत असलेल्या पुण्यातील कबीर कला मंचचे कार्यकर्ते सुनील गोरखे यांनी सुनील पाटील यांच्यावर आरोप केले होते सुनील गोरखे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडेही याची यासंदर्भात तक्रार केली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments