Friday, August 8, 2025
HomeMain Newsडॉ. गेल ऑम्व्हेटः समतावादी, मानवतावादी आदर्श

डॉ. गेल ऑम्व्हेटः समतावादी, मानवतावादी आदर्श

अमेरिकेत जन्माला आलेली, उच्च शिक्षण घेतलेली, उंच, गोरी, निळ्या डोळ्याची, सोनेरी केसाची एक मुलगी भारतात येते. अभ्यासाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर फिरते. इथल्या अनेक चळवळींचा जवळून अभ्यास करते. अभ्यास करता करता कष्टक-यांच्या चळवळींचा एक भाग बनते. त्यांच्या चळवळींना एक भक्कम वैचारिक पाया तयार करण्यास मदत करते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहते. मोर्चे, आंदोलनात त्यांचा झेंडा ख्यांद्यावर घेवून नेतृत्व करते. परिश्रमातून कमावलेले सारे ज्ञानच नव्हे तर आपले सारे आयुष्य इथल्या कष्टक-यांच्या चळवळीसाठी समर्पित करते.

कोणत्याही चित्रपटाला शोभेल अशी ही कथा. पण ही काही कुठल्या चित्रपटाची कथा नव्हे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या संशोधनाचा दबदबा आहे आणि जागतिक स्तरावर एक विदुषी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. गेल ऑमव्हेट अर्थात शलाका भारत पाटणकर यांचा हा जीवन प्रवास. अमेरिकेतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या गेल तशा मुळातच हुशार. कार्लटेन कॉलेजमध्ये (Carleton College) पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिनियापोलीस विद्यापीठातून (Minneapolis University ) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

संपूर्ण जगाला ज्या देशाचं आकर्षण आहे अशा वैभवशाली अमेरिकेत पायाशी सारी सुखे लोळण घेत असतानाही गेल भारतात आल्या. याचे मुख्य कारण त्यांची मानवतावादावर असलेली निष्ठा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अमेरिकेच्या युद्धखोर साम्राज्यवादी धोरणांच्या विरोधात उभा राहिलेल्या विद्यार्थी चळवळीत त्या सक्रीय झाल्या. विद्यार्थी चळवळीतच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा निश्चित झाली. भांडवली विकासात होणा-या कामगार कष्टक-यांच्या शोषण त्या जवळून पाहत होत्या. वर्गीय आणि लैंगिक शोषण पाहून त्या अस्वस्थ होत होत्या. त्यामुळे आपण कोणासाठी काम करायचं याची धारणा विद्यार्थी दशेतच पक्की झाली होती.

अभ्यासाच्या निमित्ताने त्या भारतात आल्या. भारतीय समाज हा जातिव्यवस्थेच्या पायावर उभा आहे. माणूस कोणत्या जातीत जन्माला आला त्यावरून त्याची जात ठरते, त्याने कोणते काम करायचे हे तो ज्या जातीत जन्माला आला त्यावरून ठरते, जातीतच लग्न करायचे त्याला बंधन राहते, इतकेच नव्हे तर हलकी, अत्यंत घाण आणि कष्टाची कामे करणा-यांना अस्पृश्य ठेवले जाते. या भयाण वास्तवाने त्या अधिकच अंतर्मुख झाल्या. भारतीय समाजात केवळ वर्गीय आणि लैंगिक शोषण होते असे नाही तर इथे जातीय शोषणही होते हे त्यांना दिसून आलं. शोषणाचं आणखी अंग त्यांना जाणवलं. त्यामुळे भारतीय समाजक्रांती ही वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत एकाचवेळी केल्याशिवाय होणार नाही, अशी त्यांची पक्की धारणा झाली.

“वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड – प. महाराष्ट्रातील अब्राह्मणी चळवळ” असा त्यांनी आपल्या पी.एचडी.चा विषय निवडला. या निमित्ताने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातला. महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या त्या गाढ्या अभ्यासक बनल्या. पुढे जातीव्यवस्था आणि तिच्या अंतासाठी गौतम बुद्धांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळींचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. त्यातील उणीवा, दोष आणि शक्ती स्थाने ओळखून जातीअंतासाठी नवी सैद्धांतिक भूमिका विकसित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके, चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदा यामधून त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. आज भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर वैचारिक क्षेत्रात सैद्धांतिक भूमिका मांडणारे भरपूर विचारवंत-विदुषी आहेत. पण वैयक्तिक जीवनामध्ये स्वतः मांडलेला विचार आचरणात आणणा-यांची मात्र वानवा आहे. डॉ. गेल मात्र याला अपवाद आहेत. स्वतःच्या खाजगी आयुष्यामध्येही त्या स्वतःच्या विचाराशी ठाम राहिल्या.

वर्गीय, जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करून नवा समतावादी समाज निर्माण करण्यासाठी कष्टक-यांच्या चळवळीत झोकून देवून काम करणा-या डॉ. भारत पाटणकर या जीवनदानी कार्यकर्त्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला. आयुष्यभर स्वतःचे संशोधन, नोकरी असा व्याप सांभाळत एका पूर्णवेळ कार्यकर्त्याचा संसार सांभाळण्याचं अवघड काम त्यांनी लीलया पेललं. स्वतः नोकरी केली, लिखाण केलं, संशोधन केलं त्यातून जे काही पैसे मिळाले ते सगळे पैसे कष्टक-यांच्या चळवळीवर खर्च केले. स्वतःच्या गरजा कमी केल्या पण चळवळ पैशाअभावी थांबू दिली नाही. आज श्रमिक मुक्ती दल आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली १०-१२ जिल्ह्यांमध्ये जी काही चळवळ उभी आहे त्यामागे डॉ. गेल यांचा फार मोठा त्याग आहे.

अमेरिकेतील गोरी म्याडम बघता बघता अस्सल मराठमोळी बाई कधी बनली तेच कळले नाही. सांगली जिल्ह्यातल्या परित्यक्त्या स्त्रियांची ती मैत्रीण बनली. क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर या आपल्या सासूबाईला सोबत घेवून जिल्हाभर फिरली. नव-याने सोडलेल्या, एकट्या राहणा-या स्त्रियांना भेटली. त्यांना संघटित केलं. त्यांना आत्मभान दिलं. त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना करून दिली. लढण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण केली. आणि परित्यक्त्याच्या हक्कांचा एक ऐतिहासिक लढा यशस्वी करून दाखविला. आपल्या सहकारी मैत्रिणींच्या मदतीने बहे ता. वाळवा जि. सांगली येथे परित्यक्त्यांची स्वमालकीची घरे उभा करून दाखवली.

खरंतरं डॉ. गेल म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोशच. सततच्या अभ्यास, संशोधन, आणि चिंतनातून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. कोणताही विषय घ्या त्या विषयातलं सखोल ज्ञान डॉ. गेल यांच्याकडे आहे. समाजशास्त्राबरोबर साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य सभा असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळ असो या दोन्ही चळवळींची भूमिका विकसित करण्यात डॉ. गेल यांचा सहभाग महत्वाचा राहिला आहे.

विशेषतः जाती व्यवस्था आणि स्त्रियांचे शोषण हा त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय. त्यामुळे या देशातील जाती व्यवस्था आणि तिच्या अंतासाठी केला गेलेला संघर्ष या विषयावर संशोधनात्मक आणि चिकित्सक लिखाण त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. भारतातील नवी सामाजिक चळवळ, दलित आणि लोकशाही क्रांती, जातीविरोधी चळवळ आणि भारतीय संस्कृती- दलित दृष्टिकोन, ब्राह्मण्यवाद आणि जातीवाद विरुद्ध बुद्धवाद, भारतीय स्त्रियांचा संघर्ष यासह अलीकडेच नुकतेच त्यांचे तुकोबाची गाणी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकांशिवाय अनेक छोट्या छोट्या पुस्तिकांसह विविध नियतकालिकातून त्यांनी विपुल लिखाण केले आहे.

आज समाजात केवळ मी आणि माझे कुटुंब या पलीकडे कोणी पाहायला तयार नाही. प्रत्येकाने स्वतःभोवती एक कुंपण घालून घेतले आहे. त्या कुंपणाच्या आत स्वतःच्या विश्वात जो तो हरवून गेला आहे. अशावेळी डॉ. गेल यांचे काम अधिक ठळकपणे अधोरेखित होते. अमेरिकेसारख्या प्रगत आणि ऐश्वर्यसंपन्न देशात जन्म, हाती ख्यातनाम विद्यापीठाची पदवी आणि कोणत्याही कामात झोकून देवून काम करण्याची वृत्ती यामुळे लौकिक अर्थाने त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप पैसा, संपत्ती आणि नाव मिळवता आले असते. पण या सा-या सुखांना ठोकरून डॉ. गेल भारतासारख्या एका नव्या देशात आली आणि इथल्या समाजजीवनाचा भाग होवून गेली.

मुळातच संशोधक वृत्ती असलेली डॉ. गेल भारतात आली आणि तिच्या संशोधक नजरेला इथले भीषण समाज वास्तव दिसून आले. डॉ. गेल जरी संशोधक असली तरी ती रुक्ष आणि कोरडी संशोधक नव्हती. प्रथम ती एक संवेदनशील माणूस होती. समतावादी आणि मानवतावादी विचारधारेशी ती आत्यंतिक प्रामाणिक होती. त्यामुळे इथली जातीव्यवस्था आणि स्त्रियांची गुलामी पाहून ती अधिकच अस्वस्थ होत होती. तिच्यातील कार्यकर्ती तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सातपुड्यातील आदिवासी पाड्यापासून खेड्यापाड्यातील गावकुसाबाहेरील वस्त्यांपर्यंत ती फिरली. भारतातील समाज बदलाच्या चळवळीचा ती कधी भाग बनली हे तिलाच कळले नाही.

त्यामुळे डॉ. गेलचे यांचे लिखाण हे भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक राजकीय चळवळींसाठी दस्तऐवज बनले. त्यांच्या लिखाणातून नव्या शोषणमुक्त समाजाकडे जाण्याचा मार्ग दिसू लागला. कोणत्याही विचारधारेचे आंधळे भक्त न बनता त्या विचारधारेला काळाच्या कसोटीवर तपासूनच घेण्याची त्यांची सवय. त्यामुळे त्यांचे लिखाण हे अत्यंत परखड असेच आहे.

काही वेळा पोथीनिष्ठ बनलेल्या कर्मठ पुरोगाम्यांनाही ते बोचणारे होते. वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर त्यांना खोडून काढणे शक्य होत नाही असे दिसताच त्यांना वैयक्तिक पातळीवर बदनाम करण्याचे कारस्थानही स्वतःला पुरोगामी समजणा-यांनी केले. पण या सा-याला त्यांनी भीक घातली नाही.

आज जागतिकीकरणाबरोबर एक नवी चंगळवादी संस्कृती इथे जन्माला येत आहे. आजच्या नव्या प्रगत भांडवली व्यवस्थेमध्ये मानवी भाव भावनाही क्रयवस्तू बनल्या आहेत. प्रेम सुद्धा बाजारपेठेतील एक वस्तू बनली आहे. प्रेमालाही आता व्यावसायिकता आली आहे. प्रेमाच्या निखळ, उदात्त आणि मानवीय हेतूबद्दलच शंका निर्माण होत आहे. या सा-या पार्श्वभूमीवर डॉ. गेल आणि डॉ. भारत यांच्या प्रेमाची उंची अधिकच गडद होते. धर्म, जात, वंश, देश-प्रदेश, भाषा, संस्कृतीच्या पलीकडे जावून त्यांच्या प्रेमाची परिकक्षा मानवी बनते. त्यांचे प्रेम निखळ मानवी संबंधाची परिभाषा बोलते.

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया ज्या पती-पत्नीने घातला ते म्हणजे म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. जोतिबाच्या प्रत्येक कृतीला सावित्रीच साथ होती तर सावित्रीच्या प्रत्येक गोष्टीला जोतिबाची शाब्बासकीची थाप होती. अगदी तसचं डॉ. गेल आणि डॉ. भारत यांच्याबद्दल म्हणता येईल. मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी आपले आयुष्य वेचले. सावित्री-जोतिबासारखं परस्परांना समजून घेत समाज बदलाची चळवळ नेटाने सुरू ठेवली. कठीण प्रसंगामध्ये परस्परांना साथ दिली. आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली ९-१० जिल्ह्यांमध्ये कष्टक-याची चळवळ उभी आहे त्या पाठीमागे डॉ. गेल यांचे योगदान खूपच मोठे आहे.

डॉ. गेल यांचे संशोधन, त्यांचे लिखाण, त्यांचा कष्टक-यांच्या चळवळीतील सहभाग, त्यांचा त्याग यातून केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या पिढीसमोर त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.

कॉ. संपत देसाई, श्रमिक मुक्ती दल, आजरा

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments