Friday, August 8, 2025
HomeMain Newsटोल प्रकरणात शिवेंद्रराजेंची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

टोल प्रकरणात शिवेंद्रराजेंची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज आनेवाडी टोलनाक्यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांना न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरवस्था, त्याचबरोबर आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत होती. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्याविरोधात याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांनी 18 डिसेंबर 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.

नुकतीच या खटल्याची सुनावणी पार पडली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांची आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.

टोलनाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून झाला होता. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा यावेळी भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments