मराठी साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना एका अनोळखी नंबरवरुन धमकी आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मंजूनाथ सिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार नेमाडे यांनी दोन आठवड्यांपूर्वी एका अनोळखी नंबरवरुन धमकीचा फोन आला होता. त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यात एक तक्रार करण्यात आली होती. भालचंद्र नेमाडे हे सध्या यवतमाळमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील वादग्रस्त उल्लेखामुळं नेमाडे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीत बंजारा समाजातील महिलाविषयी लिखाण करण्यातं आलेलं आहे. या लिखाणाबद्दल एका अज्ञात व्यक्तीनं आक्षेप घेतलाय. नेमाडे यांचं हे लिखाण बदनामीकारक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात घुसून मारहाण करु, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नेमाडेंना यापूर्वीही धमकी
भालचंद्र नेमाडे यांना 2015 मध्येही धमकीचं पत्र आलं होतं. तेव्हा गृह विभागानं तातडीनं त्याची दखल घेतली होती. समाजसेवक नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर धर्मांध संघटनांनी उघडलेल्या आघाडीची गंभीर दखल राज्याच्या गृह खात्यानं घेतल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं. त्यामुळेच भालचंद्र नेमाडे यांना धमकीपत्र मिळाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.