जेफरी एपस्टाइन हे नाव आज फक्त एका व्यक्तीचं उरलेलं नाही, तर ते एक प्रणालीगत विकृतीचं, सत्तेच्या अंधार्या कोपऱ्यांचं आणि जगभरातील सत्ताधीशांच्या चारित्र्यावरचा प्रश्नचिन्ह ठरलेलं आहे. जिवंत असताना त्याने असंख्य अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि मृत्यूनंतर त्याने अख्ख्या जगातील राजकीय, औद्योगिक आणि सत्ताकेंद्रांना हादरवून सोडलं.
एपस्टाइन तसा अभ्यासात हुशार. पण वृत्ती मात्र कायमच चंचल, अस्थिर आणि फसवणुकीकडे झुकलेली. पदवीचं शिक्षण पूर्ण न करताच तो बाहेर पडला, मात्र खोट्या कहाण्या रचून तो शिक्षक बनला. शाळेत असताना त्याच्याविरोधात विद्यार्थिनी आणि काही शिक्षिकांनी गंभीर तक्रारी केल्या. त्या तक्रारी इतक्या गंभीर होत्या की अखेर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. इथूनच त्याच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.
नोकरी गेल्यानंतर त्याने स्वतःचा ‘फायनान्शियल कन्सल्टन्सी’चा धंदा सुरू केला. श्रीमंत लोकांना पैसा कुठे गुंतवायचा, मालमत्ता कशी वाढवायची, कर कसे वाचवायचे – यावर सल्ले देऊ लागला. या धंद्यात पैसा, सत्तेची ओळख आणि सत्तेचा माज यांचा अजब संगम झाला. हळूहळू बाई, बाटली, ड्रग्ज हे सगळं त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं.
एपस्टाइन प्रचंड श्रीमंत झाला. पैसा आणि मालमत्तेची भूक वाढत गेली, पण हवस मात्र कधीच कमी झाली नाही. समुद्रात एक अख्खं बेट विकत घेण्याइतकी त्याची मजल गेली. हे बेट पुढे जगातील सत्ताधारी, उद्योगपती, राजघराणी, लेखक, पत्रकार, कलाकार अशा अनेकांसाठी अय्याशीचं केंद्र बनलं.
याच टप्प्यावर इस्राईलच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संस्थेचा संदर्भ येतो. अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते, एपस्टाइनला मोसादसाठी कामाला लावण्यात आलं होतं. त्याचं काम स्पष्ट होतं – जगभरातील प्रभावशाली लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांचे अश्लील, विकृत कृत्यांचे पुरावे जमा करायचे आणि गरज पडल्यास ब्लॅकमेलिंगसाठी वापरायचे. त्यामुळेच विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री, उद्योगपती त्याच्या रडारवर आले.
या अय्याशीमध्ये फक्त दारू, ड्रग्ज किंवा स्त्रियाच नव्हत्या. त्यात अत्यंत विकृत स्वरूपाचे गुन्हे होते – अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, बलात्कार, तस्करी. हीच गोष्ट प्रकरणाला भयंकर बनवणारी ठरली. एकदा तो पकडला गेला, तेरा महिन्यांची शिक्षा झाली, पण मोठमोठ्या लोकांच्या पाठिंब्यामुळे तो सुटला. सुटल्यानंतर त्याने आणखी जोमाने हे जाळं विणायला सुरुवात केली.
२०१९ मध्ये मात्र दुसऱ्यांदा अटक झाल्यावर प्रकरण गंभीर वळणावर आलं. कारण यावेळी लहान मुलींवरील बलात्काराचे ठोस पुरावे समोर आले होते. अशा गुन्ह्यांना कोणतीही माफी नसते. सत्ताधारी लोकही उघडपणे त्याच्या बाजूने उभे राहू शकत नव्हते. एपस्टाइन सगळ्यांसाठीच “अवघड जागेचं दुखणं” ठरला.
अटक झाल्यानंतर काही दिवसांतच जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज गायब झालं. पोलिसांनी आत्महत्येचा दावा केला, तर अनेक तज्ज्ञांनी थेट खुनाचा संशय व्यक्त केला. एपस्टाइन गेला, पण त्याच्यासोबत असलेली असंख्य गुपितंही गाडली गेली, असा अनेकांचा समज झाला. अनेक सत्ताधारी लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पण खरी कहाणी इथूनच सुरू झाली.
एपस्टाइनने मृत्यूपूर्वी ‘एपस्टाइन फाईल्स’ मागे ठेवल्या होत्या. त्यात पत्रव्यवहार, फोटो, व्हिडीओ, बैठकींच्या नोंदी – सगळं काही होतं. आज ती माहिती हळूहळू बाहेर येत आहे. सोज्वळ चेहऱ्यांमागचे विकृत चेहरे उघडे पडत आहेत. आणि विशेष म्हणजे – ज्याचं नाव जरी ओझरतं जरी या फाईल्समध्ये आलं, त्याचं करिअर संपतंय.
अमेरिकेचे श्रम मंत्री अलेक्झांडर अकोस्टा – नाव आलं, राजीनामा. ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू – नाव आलं, राजघराण्यातून बाहेर. बँकिंग, राजनय, सत्ताकेंद्र – कुठेही सूट नाही.
आता या वादळाचे पडसाद भारतात उमटत आहेत. मोदी सरकारमधील अतिशय जवळचे मंत्री हरदीप पुरी यांचा उल्लेख या फाईल्समध्ये झाल्याचं सांगितलं जातं. २०१७ मध्ये अनिल अंबानी यांचाही उल्लेख असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर त्यांच्या कंपन्यांनी डिफेन्स क्षेत्रात मोठे जॉईंट व्हेंचर करार केले, हा योगायोग आहे की काही वेगळं – हा प्रश्न उपस्थित होतो.
याहून धक्कादायक म्हणजे, नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही उल्लेख असल्याच्या अफवा. त्यामुळेच भारतीय राजकारण ढवळून निघालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण थेट सांगतात – “१९ डिसेंबरला भारताचे पंतप्रधान बदलतील.” विरोधक बोलणारच, असं म्हणता येईल.
पण भाजपचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली विधाने अधिक खतरनाक आहेत. त्यांनी हरदीप पुरी यांचा कथित सेक्स स्कॅन्डल, अमेरिकेकडे असलेले फोटो आणि त्यावरून भारताला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं, असं उघडपणे लिहिलं. एवढंच नव्हे तर मोदी यांच्या ब्रह्मचर्य आणि चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. पोस्ट डिलीट झाली, पण ती कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली.
थोडक्यात काय – जेफरी एपस्टाइन जिवंत असताना अल्पवयीन मुलींवर अत्याचार करत होता, आणि मेल्यानंतर भूत बनून जगभरातील सत्ताधीशांच्या बोकांडीवर बसला आहे. हा प्रश्न आता केवळ एका व्यक्तीचा नाही, तर जागतिक सत्तेच्या चारित्र्याचा, पारदर्शकतेचा आणि लोकशाहीच्या नैतिक अधिष्ठानाचा आहे.
खरा प्रश्न हा आहे – सत्य पूर्णपणे बाहेर येईल का? की पुन्हा एकदा पैसा, सत्ता आणि गुप्तहेर यंत्रणा मिळून सत्य गाडून टाकतील? आणि या वादळात भारताचं राजकारण कुठे जाऊन थांबेल, हे येणारा काळच ठरवेल.



