Sunday, March 8, 2026
HomeMain Newsचीनमधील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली जगाची चिंता

चीनमधील कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली जगाची चिंता

पुन्हा एकदा कोरोनाने चीनमध्ये डोके वर काढल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे काही भागात लॉकडाउन लावण्यात आले आहे. तसेच बाधितांची संख्या वाढल्यामुळे कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 चा चीनमध्ये फैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला व्हेरिएंट आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्ये पसरत असल्यामुळे भारतात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा असा दावा केला आहे की, BA.2 चा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, पण तो घातक नाही.

याबाबत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, भारतात BA.2 व्हेरिएंट कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत भारतातील ७५ टक्के प्रकरणे BA.2 सब व्हेरिएंटची होती. त्यामुळे जूनमध्ये नव्या लाटेचा अंदाज वर्तवणाऱ्या आयआयटी कानपूरमध्ये फारसे तथ्य दिसत नाही.

तर डॉक्टर राजीव यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, भारत आणि चीनच्या परिस्थितीत खूप फरक आहे. भारताने प्रादुर्भाव, रीइन्फेक्शन आणि ब्रेकथ्रू संसर्ग पाहिला असल्यामुळे येथील लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. जितक्या वेगाने तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढले, तितक्या वेगाने कमी झाले.

दरम्यान काल दिवसभरात भारतात २,८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३,८८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर ९८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. देशातील दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.३८ टक्के एवढा आहे. सध्या देशात ३२,८११ कोरोनाबाधित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ५० हजार ५५ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर कोरोनामुळे ५ लाख १६ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments