कराड | एका धडाडीच्या तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. कराड एस.टी. स्टँडवर काल साधारणपणे २५ वर्षीय तरुणी पूर्ण दिवस उपाशीपोटी बसून मदतीची वाट पाहत होती. आई-वडील नसलेली, नातेवाईक नसलेली आणि स्वतःच्या जोरावर आयुष्य जगणारी ही मुलगी मागील काही दिवसांपासून एक व्यक्तीचा सततचा त्रास सहन करत होती. त्याच्या विकृत मागण्या नाकारल्यामुळे कोयनानगर येथे तिच्यावर निर्दयी हल्ला करण्यात आला.
हल्ल्याची क्रूरता इतकी भीषण की तिच्या हातावर, पाठीवर, पायांवर काठीचे वळ, डोक्यावर खोल जखमा आणि शरीराचा अनेक भाग सुजलेला असा गंभीर परिणाम तिच्यावर झाला. तरीही पाटण पोलीस स्टेशनने तिची तक्रार केवळ किरकोळ NC स्वरूपात नोंदवत कोणतीही वैद्यकीय मदत न देता तिला परत पाठवले — ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे.
याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या किरण हादवे पाटण पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त आल्या असताना त्यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ त्या तरुणीला संपर्क करून योग्य मदत मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीशी जोडले. ते कराडला पोहोचेपर्यंत मुलगी एस.टी. स्टँडवर शांतपणे बसून त्यांची वाट पाहत होती.
कराडमध्ये प्रथम तिला मानसिक आधार देण्यात आला, खायला देण्यात आले आणि तत्काळ कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तेथील अधिकारी माळी सर यांनी स्वतः तरुणीची अवस्था पाहून तक्रारीची सर्व प्रक्रिया सुरू केली.
यानंतर तरुणीला तत्काळ कराड कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिचे औषधोपचार सुरू आहेत.
आरोपी अजूनही मोकाट
इतक्या भयानक प्रकारानंतरही संबंधित आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस यंत्रणेने अशा गंभीर प्रकरणात योग्य, त्वरित आणि कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
न्यायासाठी ठाम भूमिका
त्या तरुणीच्या पूर्ण पाठीशी उभे राहत संबंधित व्यक्तीने स्पष्ट केले आहे की —
“तिला न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. पाटणचे डीवायएसपी यांना भेटून संपूर्ण तक्रार सविस्तर नोंदवण्यासाठी व आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी मी अधिकृत निवेदन देणार आहे.” असे किरण हादवे यांनी सांगितले
महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत
हा केवळ एका मुलीचा प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा ठाम संदेश या प्रकरणातून पोहोचत आहे.



