पंजाबी गायक व अभिनेता दिलजित दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौतसोबतच्या ट्विटर वॉरमुळे प्रचंड चर्चेत आहे. शेतकऱ्यांविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्या कंगनाला दिलजित दोसांझने सडेतोड भाषेत उत्तर दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले होते. त्यानंतर दिलजित दोसांझ पुन्हा एकदा त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत आला आहे. दिलजित दोसांझ याने कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या शेतकऱ्यांना थंडीपासून संरक्षण करणारे कपडे उपलब्ध व्हावेत म्हणून दिलजित दोसांझने हे पैसे दिल्याचे समजते. सिंघू बॉर्डरवर अनेक वृद्ध शेतकरी कडाक्याची थंडी असतानाही ठिय्या मांडून बसले आहेत.
आठ दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकरी आणि केंद्र सरकारची एकही चर्चा सफल होताना दिसत नाही. आता पुढची बैठक 9 डिसेंबरला होणार आहे. तेव्हाही केंद्र सरकार या सगळ्यावर समाधानकारक तोडगा काढले की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन दिलजित दोसांझने कडाक्याच्या थंडीपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना उब देणारे कपडे आणि ब्लँकेटस देण्याचा निर्णय घेतला. हे कपडे खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझने 1 कोटी रुपये देऊ केले आहेत. विशेष म्हणजे दिलजितने याबद्दल स्वत:हून सांगितले नाही. पंजाबी गायक सिंघा याने शेतकऱ्यांसमोर झालेल्या कार्यक्रमात हा खुलासा केला. या मदतीसाठी त्याने दिलजितचे आभारही मानले.