राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. महाराष्ट्रात तर फार भीषण परिस्थिती आहे. कोरोनामुळे राज्यातील मृत्यू दरातही प्रचंड वाढ झालीय. उस्मानाबादेत तर आज (16 एप्रिल) दिवसभरात तब्बल 23 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीत मृतक रुग्णांच्या नातेवाईकांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. अंतिम दर्शनासाठी कुणी स्मशानभूमीच्या कम्पाउंडवर तर कुणी उंच डोंगरावर उभं राहून मयताचे अंतिम दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होतं. त्यांचा हा प्रयत्न मनाला चटका लावणारा अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुरी
एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार करण्याची ही उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरी वेळ आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा अपुरी पडत आहे. यापूर्वी 14 एप्रिलला 17 कोरोनाबाधित मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाने 667 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. स्मशानभूमीत आज जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. इतकंच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत