राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा आवाज काढून थेट मुख्यमंत्री कार्यलयात एकाने फोन केला होता. फोन करून अमुक एक व्यक्तीची बदली अमुक ठिकाणी करा, अस थेट फर्मानच दिलं होतं. खुद्द शरद पवार साहेब फोन करत आहेत, असा प्रकार कधी होत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट पवारांनाच हा प्रकार सांगितला. त्यावर पवारही आश्चर्यचकीत झाले. चौकशीत हा बोगस कॉल असल्याचं उघड झालं. त्यानंतर गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक व्यक्तीला ताब्यात ही घेण्यात आलं आहे.)
तारीख 11 ऑगस्ट 2021
वेळ दुपारची….
स्थळ – मंत्रालयातील सहावा मजला अर्थात मुख्यमंत्री कार्यलय…
येथील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास फोन आला. समोरचा व्यक्ती मी शरद पवार बोलतोय, अस सांगत होता. समोरून येणारा आवाज ही तसा परिचित वाटणारा…त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जी सर, जी सर करू लागला…
आता खुद्द शरद पवार हेच बोलत आहे म्हटल्यावर त्यांना कोण टाळणार… अधिकाऱ्यांने सविस्तर सर्व ऐकून घेतलं. समोरून बोलणारा व्यक्ती आपण शरद पवार बोलतोय. एक काम होत म्हणून फोन केला. अमुक अधिकाऱ्यांची बदली अमक्या ठिकाणी करा, अशा माझ्या सूचना आहेत. अस बोलून त्या व्यक्तीने फोन ठेवून दिला.
या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यलयातील तो वरिष्ठ अधिकारी बुचकळ्यात पडला. आवाज सेमटू सेम. आलेला नंबर ही बरोबर आहे. तरीही त्याला शंका येत होती. शरद पवार साहेब स्वतः बदल्या बाबत फोन करत नाहीत. त्याचप्रमाणे ते थेट फोन करणार नाहीत. तिसरा महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे समोरच्या व्यक्तीने मी सिल्व्हर ओक येथून बोलतोय अस सांगितलं होतं. या तीन गोष्टी विसंगत होत्या.
मग हे सर्व खात्री करून घ्यायच ठरलं. एक अधिकाऱ्याने सिल्व्हर ओक गाठून शरद पवार साहेब यांची भेट घेतली. त्यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकण्यात आला. त्यावर पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. यानंतर मात्र, शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून तो व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचा प्रयत्नात असल्याचं उघड झाल. मात्र, हा सर्व प्रकार खोटा होता. फसवणूक करणारा होता. यामुळे मग याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फोन मंत्रालयात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने कुठून फोन केला हे माहीत नव्हतं. तर फोन करण्यासाठी शरद पवार यांच्या घरच्या नंबर सारखा नंबर वापरण्यात आला होता. यामुळे मग सिल्वर ओक येथील ऑपरेटरने तक्रार द्यायची ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिल्वर ओक इस्टेट या ठिकाणी राहतात. यामुळे मग गावदेवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आयटी कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे. एखाद्या अॅपचा वापर करून सिल्वर ओक इथला नंबर बनवण्यात आला होता. त्यामुळे या गुन्ह्यात आयटी अॅक्ट लावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकानेही सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी एक संशयित व्यक्तीस ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.