बदलापुरातील घटनेवरुन राजकारण होताना पाहायला मिळत आहे. या घटनेत राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं घटना समोर येण्यास विलंब लागल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बदलापुरात आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याची घटनादेखील काल घडलीय. यात आंदोलकांची काय चूक?, असा प्रश्न उपस्थित होतोय. ती शाळा भाजपा नेत्याशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय. म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पण ही शाळा भाजपा सोडून अन्य राजकीय पक्षाची असती, तर भाजपाच्या लोकांनी मुख्यत: देवेंद्र फडणवीसांसह त्यांच्या महिला मंडळानी शाळेत ठिय्या मांडला असता, असं शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे. “ही शाळा भाजपा नेत्याची आहे. पीडित कुटुंबाचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी 12 तास लावले. पोलिसांवर दबाव होता. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला”, असा आरोप माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. “दुसरीकडं सरकार चांगलं काम करतेय म्हणून सरकारला गालबोट लावण्यासाठी आंदोलनात विरोधकांनी माणसं घुसवली. किमान याबाबत तरी विरोधकांनी राजकारण करू नये,” असं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.
बदलापूरच्या घटनेतत कारवाई करण्यास उशीर झाला, यावर राज ठाकरे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले,” यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली. विषय लावून धरल्यानंतर त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं. मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये. दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ? जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.”