सातारा जावळी विधानसभा मतदार संघात महायुतीने यापूर्वीच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकौन अर्ज भरण्यास दिवस उरले असताना देखील उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली. तत्पूर्वी कदम यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन सन्मानपूर्वक शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने उमेदवारी लढवण्यासंदर्भात एबी फॉर्मदेखील देण्यात आला. त्यामुळे आता सातारा विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध अमित कदम असा दुरंगी सामना रंगणार आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीने मात्र उमेदवार ठरवण्यात विलंब केला. त्याबाबत शनिवार, रविवार मुंबई येथे महाविकास आघाडीमध्ये अनेक राजकीय खलबते झाली. प्रामुख्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाईल असे राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सोडला गेल्याने दोन दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी मुंबईमध्ये घडल्या.
शिवसेनेकडून इच्छुक असलेले जिल्हाप्रमुख सचिन मोहिते व एस. एस. पार्टे यांची पक्षाने अखेर समजूत काढीत ही उमेदवारी अमित कदम यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. एकसंघपणे महाविकास आघाडीने सातारा विधानसभेत आपली ताकद दाखवावी, अशा सूचनाही पक्षश्रेष्ठंकडून प्रमुख नेत्यांना देण्यात आल्या आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघातील हा सामना आता महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीकडून अमित कदम असा दुरंगी होणार आहे.
जावळीचे माजी आमदार जी.जी. कदम यांचे सुपुत्र अमित कदम सातारा विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरले आहेत. साताऱ्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेली असती तर तिथे दीपक पवार हे देखील इच्छुक होते. तर, ठाकरेंच्या शिवसेनेतून जिल्हाप्रमुख सचिन मोहिते इच्छुक होते. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमित कदम यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित कदम यांचा राजकीय ‘कस’ या निवडणुकीत पणाला लागणार आहे. एकीकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघात उभा केलेला विकासाचा डोंगर त्यांच्यासोबत प्रमुख कार्यकर्ते संस्था, ग्रामपंचायतीदेखील त्यांचाच ताब्यात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अमित कदम यांना तितकी सोपी नसणार आहे. अमित कदम यांना सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीत सर्व शक्तींनिशी उतरावे लागणार आहे.
अमित कदम यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. संजय राऊत यांनी काल कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात सातारा आमच्याकडे घेतल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता सातारा विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केला आहे.
शिवेंद्रराजे भोसले पुन्हा एकदा भाजपच्या चिन्हावर सातारा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. आता त्यांच्यासमोर अमित कदम यांचं आव्हान आहे. अमित कदम देखील भाजपमध्ये गेले होते. भाजपची साथ सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सदस्यत्व घेतलं होतं. जागा वाटपात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं त्यांना शिवबंधन बांधाव लागलं आहे.