उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट कल्पनेपेक्षा अधिक व्यापक आहे. या सगळ्याची कसून चौकशी झाली तर फटाक्याची माळ लागेल, अनेकजण तुरुंगात जातील, असा दावा यांनी केला. यावेळी त्यांनी अंबानी यांच्या घराबाहेरील गाडीत स्फोटकांसोबत सापडलेल्या पत्राविषयी एक थिअरीही मांडली.
राज ठाकरे यांनी या पत्राच्या सत्यतेविषयीच शंका उपस्थित केली. नीता भाभी आणि मुकेश भैया तुमच्याखाली आम्हाला बॉम्ब फोडायचाय, असे या पत्रात म्हटले आहे. धमकी देणारा माणूस आदराने कसा बोलू शकतो? साहेब तुमची वाट लावतो बघा, असं तो कशाला बोलेल? या पत्राचा टोन बघितला तर एखादा गुजराती माणूस जसं हिंदी बोलतो, तशी भाषा या पत्रात असल्याचे लक्षात येईल, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या पत्रात गुडनाईची स्पेलिंग Goodnit अशी लिहली आहे. पत्र लिहिताना त्याने ‘नीट’ (पेग) लावली असणार. पण अशाप्रकराचं धाडस पोलीस करु शकत नाहीत, असेही राज यांनी म्हटले.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याची माहिती समोर आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधूर संबंध सर्वश्रूत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अंबानी व्यासपीठावर उपस्थित होते. मग असे असताना पोलीस अंबानी यांच्याकडे पैसे मागायची हिंमत कशी करू शकतील? अंबानी यांच्या घराखाली कोणाला सांगितल्याशिवाय एखादा पोलीस अधिकारी बॉम्ब कसा ठेवेल? कोणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असतो. या सुरक्षाकड्यात इस्रायली लोकांचाही समावेश आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे पोलीसही अंबानी यांच्या दिमतीला आहेत. ते याठिकाणी का आहेत, हे कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.