विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रात परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतच्या विषयावर सूचना करण्यासाठी सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. या समितीने आज आपला अहवाल सादर केला. त्यात बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत यूजीसीकडे मुदतवाढ मागावी, अशी मागणी केली आहे.
सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना संपूर्ण सप्टेंबर महिना अभ्यासासाठी मिळणार आहे. साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांना प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांना घरातून बाहेर पडून परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागू नये, त्यांना कमीत कमी मानसिक व शारीरिक त्रास होईल, अशा सूचना विद्यापीठांना करण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
यंदा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा कमी गुणांची असेल. या परीक्षेचे नेमके काय स्वरूप असेल, याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी कुलगुरूंच्या समितीने दोन दिवसांची वेळ मागितला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावून परीक्षा घेण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव यूजीसीकडे पाठवला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.