Monday, March 23, 2026
Homeसातारासाताऱ्यातील , अपक्षांची वाढती ताकद आणि ‘महाराजांच्या फोटो’वरील राजकारण

साताऱ्यातील , अपक्षांची वाढती ताकद आणि ‘महाराजांच्या फोटो’वरील राजकारण

साताऱ्यातील नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. भाजपने ज्या ठिकाणी महायुती निश्चित नव्हती, तिथे बंडखोरांना उमेदवारीची संधीच दिली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, काही अपक्ष जागांवर उमेदवारी अर्ज मिळू नये म्हणून ठरवून विलंब केला गेला, अशी मोठी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसते आहे. साताऱ्यातील बहुतेक अपक्ष उमेदवार कोणतेही राष्ट्रीय नेत्यांचे—मोदी, शाह, योगी किंवा राजनाथ—फोटो पोस्टर्सवर छापत नाहीत. त्यांनी आपल्या पॉपलेटवर फक्त दोन्ही महाराजांचे फोटो छापले आहेत. आणि हे दोन्ही महाराज—उदयनराजे आणि शिवेंद्रराजे —कुणाच्या मालकीचे नाहीत; त्यांची निष्ठा, इतिहास आणि प्रेरणा कोणत्याही पक्षाच्या ताब्यात नाही.

साताऱ्यात अपक्षांची संख्या वाढण्यामागे एकच कारण वारंवार सांगितले जाते—काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, फक्त राजकीय सोयीसाठी तिकीटे वाटणे. जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे दोन्ही महाराजांची सेवा करत आले, शहराच्या प्रत्येक कार्यक्रमात श्रमदान करत उभे राहिले, त्यांना वगळून ज्यांना कधीच साताऱ्यात पाहिले गेले नाही अशांना तिकीटे मिळाली. यामुळे नैसर्गिकरित्या नाराजी वाढली आणि बंडखोरी हा एकमेव मार्ग कार्यकर्त्यांसमोर उरला.

अचानक आलेले प्रसिद्धिपत्रक  भीती कुणाची?

बंडखोरीचा जोर वाढू लागल्यानंतर अचानक आमदार अतुल भोसले यांचे एक प्रसिद्धिपत्रक येते—
अपक्षांनी दोन्ही महाराजांचे फोटो पोस्टरवर लावू नयेत.”

या पत्रकाने साताऱ्यातील राजकारणात खळबळ उडवली. कारण हा प्रश्न कराडचा  नसून, हा साताऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

साताऱ्यात गेली कित्येक वर्षे शेकडो फुटांचे अनधिकृत, बेकायदा बॅनर्स लावले जात होते. याच अपक्ष उमेदवारांनी, आज ज्यांना लक्ष्य केले जात आहे, त्यावेळीच ते बॅनर्स लावले. तेव्हा अशी कोणतीही प्रसिद्धिपत्रके काढून अतुल भोसले यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला नव्हता. मग आजच इतकी तातडी का?

एका अपक्षाने आपल्या पॉपलेटवर महाराजांचा फोटो छापला, म्हणून त्याच्यावर दमदाटी?
हा कोणता राजकीय संस्कार? कोणता पक्षीय शिस्तीचा नियम?

महाराजांचे फोटो कोणाचे?

आज प्रश्न एकच —
महाराज आणि कार्यकर्ते यात मालकीचा संबंध आहे का?

दोन्ही महाराजांची सेवा करणारे कार्यकर्ते हेच ते लोक आहेत, जे वर्षानुवर्षे:

  • यात्रांमध्ये ध्वज उचलत राहिले,
  • पालख्यांचे आयोजन करत राहिले,
  • दशक्रिया कार्यक्रमांपासून शहरातील संकटांपर्यंत आपले श्रम देत राहिले,
  • साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी रात्र-रात्र जागत राहिले.

हे लोक बाहेरून आणलेले नाहीत. हेच साताऱ्याचे खरे रक्त, खरे कार्यकर्ते, खरे राष्ट्रनिष्ठ लोक.
अशा लोकांना तुम्ही सांगता—“महाराजांचे फोटो लावू नका”?

मग सांगा—कोणत्या महाराजांनी कार्यकर्त्यांना फोटो वापरण्याचा आदेश दिला?
महाराजांची शिकवण तर सत्य, प्रामाणिकपणा आणि शौर्याची आहे. त्यांची परंपरा राजकारणातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आहे. मग त्यांच्या फोटोच्या वापरावर बंदी हा कोणत्या ‘भीतीचा’ परिणाम आहे?

जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अपक्षांची भीती?

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, सत्तेत आहे, संसाधने आहेत, कार्यकर्ते आहेत. मग साताऱ्यातील काही अपक्ष उमेदवारांची एवढी भीती का वाटते?
जर काम केले असेल, विकास झालेला असेल, जनतेचा विश्वास असेल — तर मग अपक्षांचा फोटो कोण लावत आहे याने काय फरक पडतो?

याच भीतीमुळे प्रसिद्धिपत्रके काढली जात आहेत का?
असे वाटते की तुम्हाला तुमच्या उमेदवारांच्या स्थितीची जाणीव झाली आहे.

ज्यांना वापरले ते विसरले — कार्यकर्त्यांची भावना दुखावली

राजकीय गणित मांडताना पक्ष कार्यकर्त्यांचा ‘वापर’ करतो. सभांसाठी वापरा, धावपळीसाठी वापरा, रात्री जागण्यासाठी वापरा…
पण त्यांच्या हक्काची जागा देताना मात्र त्यांना डावलले जाते. म्हणूनच आज तेच कार्यकर्ते उमदेवार  म्हणून उभे आहेत.

जर अतुल भोसले यांना वाटत असेल की हे बंडखोर चुकीचे आहेत, तर उद्या ते बंडखोर निवडून आल्यावर त्यांनी त्यांचा पाठिंबा घेऊ नये. पण राजकारणात असे होत नाही — कारण शेवटी सत्ता महत्त्वाची असते, मग ती बंडखोरांनी दिली तरी हरकत नसते.

पण जर असा नियम लावायचाच असेल तर दोन्ही बाजूंना एकच मापदंड असायला हवा.

साताऱ्याची जनता सर्वकाही पाहते

साताऱ्यातील जनता इमोशनल आहे, पण भोळी नाही.
तिला दिसते आहे—

  • कोण काम करणारा कार्यकर्ता आहे,
  • कोण फक्त सत्ता मिळण्यासाठी पुढे येत आहे,
  • कोणाला कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत,
  • आणि कोण फक्त फोटोवरून राजकारण करत आहे.

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे —
बंडखोरी ही कार्यकर्त्यांनी उगाच मनात ठेवलेली नाही.
ही बंडखोरी पक्षाच्या चुकीच्या निर्णयांमुळे, गैरव्यवस्थेमुळे आणि अन्यायामुळेच उभी राहिली आहे.

जबाबदार कोण?

आज साताऱ्यात जी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार कार्यकर्ते नाहीत.
जबाबदार ‘ते’ आहेत ज्यांनी:

  • खऱ्या निष्ठावानांना डावलले,
  • बाहेरील लोकांना तिकीटे दिली,
  • कार्यकर्त्यांच्या नाराजीला दुर्लक्ष केले,
  • आणि आता बंडखोरी वाढल्यावर अचानक पत्रके काढून गोंधळ माजवला.

आज दोन्ही महाराजांनी वचन, धर्म आणि कर्तव्य जपणाऱ्यांना आधार द्यायला हवा.
राजकारणासाठी नव्हे, तर सत्यासाठी.

बंडखोर उमेदवार उभे राहिले याचे कारण स्पष्ट आहे—
कारण त्यांच्या निष्ठेचा गैरवापर झाला.
म्हणूनच आज साताऱ्यात एकच आवाज ऐकू येतो—
निष्ठा मोडल्यावर बंडखोरी जन्म घेते.”

आणि म्हणूनच, भाजपने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा—
आम्हीच केलेल्या चुका आज आमच्यावर उलटत आहेत का?”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments