Saturday, August 9, 2025
HomeMain Newsशासनाची अशाप्रकारची वागणूक योग्य आहे का?

शासनाची अशाप्रकारची वागणूक योग्य आहे का?

एका डॉक्टरचे हात मागे बांधण्यात आले, त्यांना ओढत ओढत रस्त्यावर आणले गेले, मारहाण झाली. हे करणारे पोलिस होते..प्रशासन होते!
डॉ. सुधाकर राव… हे नाव कालपर्यंत माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. ‘जगात प्रथमच घडतंय’ अशा बातम्या देण्यात व्यस्त असणाऱ्या मीडियाला अजूनही हे नाव घ्यायला वेळ नाही. एक डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे की, मी किमान निषेधतरी नोंदवावा… मला माहितीये की यापलीकडे आजघडीला काही करूही शकत नाही.
आंध्रप्रदेशातील नरसीपटनम येथील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी… डॉ. सुधाकर राव (भुलतज्ञ). कदाचित दीड महिन्यापूर्वी कुठेतरी हे नाव आपल्या कानावर पडलेही होते पण या कोरोनाच्या लाटेत तेंव्हाच नकळत विसरूनही गेले होते. मार्चमध्ये जेव्हा आपला देश कोरोनामय होण्यास सुरुवात झाली होती तेव्हा आंध्रप्रदेशातील या डॉक्टरने तिथल्या सरकारविरोधात आवाज उठवला होता. त्याचं कारण होतं मास्क आणि PPE Kit! कोरोनाविरूद्धच्या लढाईत ढाल म्हणून आवश्यक असणारे N-95 मास्क आणि PPE Kit मिळत नाही म्हणून या डॉक्टरांनी तिथल्या शासन आणि प्रशासनाला प्रश्न विचारले होते. त्यांना एक मास्क पंधरा दिवस वापरण्याची सक्ती केली होती. शासन जागे व्हावे म्हणून त्यांनी अशा आशयाचा एक विडीओ सोशल मीडियात टाकला होता. त्याना जे अत्यावश्यक आहे ते मिळवून देणे तर दूरच पण आंध्रप्रदेशातील आरोग्य विभागाने डॉक्टर सुधाकर यांना सस्पेंड केले, समाजात चुकीची माहिती पसरविली म्हणून गुन्हा नोंदवून नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
ही गोष्ट एवढ्यापुरतीच थांबली नाही. आपल्या विधानावरून ते मागे हटत नव्हते म्हणून त्यांना पोलिस स्टेशनमध्ये टाकण्यात आले…पण ते एवढे सरळ नव्हते. डॉ. सुधाकर यांचे हात मागे बांधून ओढत अॉटोपर्यंत नेले. रस्त्यावर त्यांना पोलिसांकडून काठीने मारहाण करण्यात आली. सर्वात वाईट म्हणजे त्यांच्यावर मनोरूग्ण आणि ‘Alchoholic’ असा ठपका ठेवून त्यांना मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले.
वातावरण तापलेले दिसताच, ज्या कोन्स्टेबलनी हे कृत्य केले त्या दोघांना सस्पेंन्ड करून प्रशासनाने आपले अंग यातून काढून घेतले.
शासनाच्या चूका, गलथान कारभार लोकांच्या नजरेत आणून दिल्याबद्दल ही वागणूक मिळत असेल तर उद्या कोणी जीव गेला तरी तोंडातून शब्द बाहेर काढण्याची हिंमत करणार नाही. एखाद्या रस्त्यावरील गुंडालासुद्धा गर्दीतून नेतेवेळी ‘इज्जतीत’ नेले जाते इथे तर तो तुमचा ‘कोरोना वॉरियर’ आहे. उघड्या अंगाने ओढत नेऊन त्यांना मनोरूग्ण सिद्ध करणे हाच शासनाचा अट्टहास होता. जरी ते नशेत होते किंवा मनोरूग्ण होते तरी एका सरकारी डॉक्टरला पोलिसांना अशाप्रकारे मारण्याचा अधिकार राहत नाही.

शासनाची अशाप्रकारची वागणूक योग्य आहे का?
जर असेल तर असा समाज डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यास लायक आहे का?
स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा समाजाला उपचारच न देणं ठीक नाही का?

डॉ. सुधाकर यांच्यासोबत जे झाले ते अत्यंत वाईट झाले पण सर्वात वाईट म्हणजे हे समोर रस्त्यावर सर्व घडत असताना शेकडो लोक पाहत होते. हे तेच लोक होते ज्यांनी काही दिवसांपूर्वी डॉक्टरांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या होत्या…

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments