Saturday, August 9, 2025
HomeMain Newsराज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजाराची मदत

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजाराची मदत

राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक बैठक पार पडली यात मुख्यमंत्र्यांनी कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश दिले आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेदेखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक झाली होती.

गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास ८ हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास ४८ हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रति कलाकार ५ हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास २८ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न  झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास ८४७ संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी ६ कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments