Saturday, August 9, 2025
HomeMain Newsराज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

राज्यातल्या ७५ टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्ह्यांची नोंद

सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ७५ टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तशी माहितीही या मंत्र्यांनी दिली असून असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने ही माहिती उघड केली आहे.

महाराष्ट्रात ९ ऑगस्टला एकनाथ शिंदे यांचा शिवसेना बंडखोर गट व भाजप सरकारने १८ मंत्र्यांना शपथ दिली. यापैकी १५ मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे तर १३ मंत्र्यांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. एडीआर व महाराष्ट्र इलेक्शन वॉच या दोन संस्थांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान या मंत्र्यांना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथ पत्रांची माहिती मिळवली व त्यातून हा खुलासा झाला आहे.

महत्त्वाची गोष्ट ही की या मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेतच पण सर्व मंत्री कोट्यधीश आहे. या मंत्र्यांची सरासरी संपत्ती ४७.४५ कोटी रु. इतकी नोंदली गेली आहे.

एकनाथ शिंदे बंडखोर गट व भाजप सरकारमध्ये सर्वात श्रीमंत मंत्री भाजपचे मंगल प्रभात लोढा असून ते मलबार हिल मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांची एकूण संपत्ती ४४१.६५ कोटी रु. इतकी आहे तर सर्वात कमी संपत्ती पैठण मतदारसंघातले आमदार संदीपनराव भुमरे यांची २.९२ कोटी रु.ची आहे.

महाराष्ट्राच्या या नव्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. जे मंत्री झाले आहेत त्या पैकी ८ मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता १० वी ते १२ वी दरम्यान असून ११ मंत्र्यांनी पदवी वा त्यापुढील शैक्षणिक पात्रता मिळवली आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments