विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा, आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जागतिक परिस्थिती बघतां, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारतां येत नाही. दिवाळी नंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ज्या शाळांमध्ये क्वॉरंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी या सारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मुल आजारी आहे, किंवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.