ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना साहित्यविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला असून रत्नाकर मतकरी यांना बालसाहित्यातील योगदानाबद्दल या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, तर नवनाथ गोरे यांना ‘फेसाटी’ कादंबरीसाठी युवा साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली अलबत्या गलबत्या, निम्माशिम्मा राक्षस, अचाटगावची अफाट मावशी ही नाटके विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी १९६२ साली बालनाट्यसंस्थेची स्थापना केली. त्यांनी प्रायोगिक नाटकांना होणारा तोटा कमी व्हावा यासाठी नाटक तुमच्या दारी ही संकल्पना सुचवली होती. मोठ्या नाट्यगृहांचे भाडे परवडणे बहुतांशवेळा शक्य नसते तेव्हा नाटकांनीच लोकांच्या घरांपर्यंत जावे अशी ही कल्पना होती. सोसायट्यांचे हॉल, घरांची गच्ची यावर ही नाटके करता येतील असे त्यांचे मत होते.
१४ नोव्हेंबर म्हणजे बालदिनी बालसाहित्यासाठीचे पुरस्कार दिले जाणार आहेत. देशातील २२ भाषांचे प्रतिनिधी हे पुरस्कार निवडणाऱ्या समितीमध्ये असून ख्यातनाम कन्नड लेखक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार या समितीचे अध्यक्ष आहेत.