Sunday, March 1, 2026
HomeMain Newsमेधा कुलकर्णींचा मोर्चा धर्माच्या नावावर तणाव की राजकारणाचा खेळ?

मेधा कुलकर्णींचा मोर्चा धर्माच्या नावावर तणाव की राजकारणाचा खेळ?

पुण्यातील शनिवारवाडा परिसरात काही मुस्लिम मुलींनी नमाज पठण केले, आणि त्यावरून भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मोठा मोर्चा काढला. या घटनेने शहरात आणि राज्यभरात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. प्रश्न असा निर्माण होतो की – या मोर्च्याचा हेतू हिंदू धर्माचे रक्षण करणे होता का, की केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम रचला गेला होता?

मेधा कुलकर्णी यांनी जर खरोखरच हिंदू समाजासाठी मोर्चा काढला असेल, तर मग सातारा जिल्ह्यातील सासपडे गावात घडलेल्या त्या भयानक घटनेवर त्यांनी मौन का धरले? एका अल्पवयीन हिंदू मुलीवर हिंदू व्यक्तीनेच अत्याचार करून तिचा जीव घेतला. तो गुन्हा हिंदू धर्मातील स्त्रीचा नव्हे का? अशा वेळी हिंदुत्वाचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेले नेते शांत का बसतात? हीच दुटप्पी भूमिका समाजाला त्रास देते.

केरळ मध्ये एका युकावर संघाच्या लोकांनी बलात्कार केला  अत्याचार केल्याचे प्रकरण चर्चेत आले, आणि त्या

त्या युवकाला आत्महत्या करावी लागली . यावर कुठेच ‘हिंदू हिताचे रक्षक’ दिसले नाहीत.  एका संघाच्या कार्यकर्त्याने आपल्या मुलीवर अत्याचार केला, आणि पुण्यातच ३००० कोटींचा भूखंड घोटाळा झाला – या घटनांवरही मेधा कुलकर्णी यांचा आवाज उठला नाही.

मग प्रश्न असा आहे की, हिंदुत्वाचा प्रचार आणि संरक्षण नेमकं कोणत्या हेतूसाठी केलं जातंय? जर अत्याचार करणारा हिंदू असेल, तर त्याच्यावर मोर्चा निघत नाही; पण एखाद्या मुस्लिमाने नमाज पठण केलं की मोर्चा निघतो? हे केवळ निवडक नैतिकतेचं उदाहरण नाही का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मोर्चे काढणे हा मोठा अपमान आहे, कारण शिवछत्रपतींनी कधीही धर्माच्या नावावर भेदभाव केला नाही. त्यांच्या राजवटीत हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाज सुखात होते. त्यांनी न्याय आणि समानतेचा आदर्श ठेवला. आज मात्र त्यांच्या नावावरून समाजात द्वेष पसरवला जातो, आणि त्याला “संस्कृती रक्षण” म्हणून रंग दिला जातो.

शिवाजी महाराजांनी जर आजच्या काळात अशा घटना पाहिल्या असत्या, तर त्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई केली असती. कारण त्यांचे हिंदुत्व हे समतेवर आधारित होते, कट्टरतेवर नव्हे. आज मात्र काही लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी धर्म, देव, आणि शिवाजी महाराजांचा उपयोग करतात.

मेधा कुलकर्णी यांचे वर्तन एखाद्या जबाबदार खासदाराचे न वाटता, स्थानिक राजकारणातील गुंडगिरीसारखे दिसते. राज्यसभेतील पदाचा सन्मान राखण्याऐवजी, त्यांनी लोकांमध्ये द्वेषाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याच्या भूखंड घोटाळ्याचे धूळफेक करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित होतो.

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, ऐक्य, आणि प्रकाशाचा उत्सव. त्या सणात समाजात तेढ निर्माण करून वातावरण खराब करणे हे समाजद्रोही पाऊल आहे. शनिवारवाडा ही पुण्याची ऐतिहासिक ओळख आहे, कुणाची वैयक्तिक मालकी नाही. तिथे नमाज पठण झाले, दुवा मागितली गेली, म्हणजे ते पुण्याच्या संस्कृतीला धोका नाही. पुणे हे संतांच्या, विचारांच्या आणि सहिष्णुतेच्या परंपरेचे शहर आहे.

धर्माच्या नावावर लोकांना भिडवणं हे राजकारण्यांचे जुने अस्त्र आहे. जेव्हा खऱ्या प्रश्नांवर – बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार – बोलता येत नाही, तेव्हा अशा मोर्च्यांचा आधार घेतला जातो. लोकांना भावनांच्या जाळ्यात अडकवून राजकीय फायद्यासाठी समाजात विभागणी केली जाते.

मेधा ताई, प्रार्थना असो वा नमाज, दोन्हीही मानवतेकडे जाणारे मार्ग आहेत. एखाद्या धर्मातील व्यक्ती प्रार्थना करते म्हणजे त्यात दुसऱ्या धर्माचा अपमान नाही. उलट, हे एकत्र येण्याचं प्रतीक आहे. पण काहींना हे समजत नाही किंवा ते जाणीवपूर्वक समाजात गोंधळ निर्माण करतात.

आजच्या काळात खऱ्या अर्थाने “बुद्धीचे शुद्धीकरण” गरजेचे आहे – राजकीय नेत्यांचे, आणि त्यांना आंधळेपणाने फॉलो करणाऱ्या जनतेचेही. कारण देश आणि समाज हे धार्मिक द्वेषावर नव्हे, तर समानतेवर उभे असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजात भेदभाव पसरवणं ही त्यांची निंदा आहे. त्यांनी शिकवलेलं हिंदुत्व म्हणजे धर्माभिमान आणि मानवतेचा समतोल. ते कधीच दंगा किंवा द्वेष यांना पाठिंबा देणारे नव्हते.

अशा काळात लोकांनी जागरूक राहून प्रश्न विचारणे गरजेचे आहे – आपण खरंच धर्मासाठी लढतो आहोत का, की काहींच्या राजकीय स्वार्थासाठी वापरले जात आहोत? धर्म आणि समाज या दोन्हींचं रक्षण शांतता, संवाद आणि परस्पर आदरातूनच होऊ शकतं.

समारोपात, मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सारख्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यापूर्वी त्यांच्या विचारांचा आदर करावा. कारण छत्रपतींनी माणुसकीला धर्मापेक्षा वर स्थान दिलं. आणि जर ते तत्त्व आज आपण विसरलो, तर आपल्याला ना धर्म मिळेल ना समाज.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments