मुंबईच्या राजकारणात सध्या जे काही घडते आहे, ते पाहता एक प्रश्न प्रकर्षाने उभा राहतो ही लढाई नेमकी कुणासाठी आणि कशासाठी?
मराठी माणसाच्या हक्कांसाठी की केवळ हिंदू मुस्लिम या सोयीस्कर राजकीय ध्रुवीकरणासाठी?
लोढा, सोमय्या आणि त्यांच्यासारखी मंडळी आज मुंबईत पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत की येणारी निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर, मराठी माणसाच्या अस्तित्वावर किंवा मुंबईच्या मूळ आत्म्यावर न होता, धार्मिक विद्वेषावर आधारित असावी. कारण धर्माच्या नावावर भावना पेटवणे सोपे असते; पण मराठी माणसाच्या रोजगार, घर, भाषा आणि अस्मितेचे प्रश्न सोडवणे हे धाडसाचे काम असते.
आज अचानक “हिंदू महापौर” नावाचा एक नवा प्राणी जन्माला आला आहे. हा नेमका कोण आहे, त्याचे नाव काय आहे, त्याचा मुंबईशी आणि मराठी माणसाशी काय संबंध आहे हे आता जनतेला कळू लागले आहे. पण मुद्दा तो नाही.
संविधानाने प्रत्येक भारतीयाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा बौद्ध भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.
म्हणून रोजच्या धार्मिक वादात अडकणे हा माझा विषय नाही.
माझा विषय वेगळा आहे.
खूप वेगळा.
मोदीजींचे विदेश दौरे आणि दुहेरी भूमिका
आपले प्रिय पंतप्रधान, महामानव नरेंद्रभाई मोदीजी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. विशेष बाब म्हणजे — ज्या तीन देशांना ते भेट देणार आहेत, ते तिन्ही देश मुस्लिम राष्ट्रे आहेत.
आता प्रश्न असा पडतो की,
मुंबईत जे विचार ठामपणे मांडले जातात हिंदू, मुस्लिम, देशभक्ती, राष्ट्रवाद तेच विचार त्या मुस्लिम राष्ट्रांमध्येही तितक्याच ठामपणे मांडले जातील का?
जर खरोखरच हे विचार राष्ट्रहिताचे असतील, तर ते देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मांडले गेले पाहिजेत.
हवंतर मोदीजींनी आपल्या या गुजराती बांधवाला लोढांना तिकडे बोलावून घ्यावे आणि त्याने मुंबईत तुटक्या-फुटक्या मराठीत जे काही भाषणबाजी केली, तेच तिथेही मांडण्याची संधी द्यावी.
कारण,
भाषेचा अपमान आणि संस्कृतीचा अवमान हा केवळ शब्दांचा प्रश्न नसतो, तो अस्मितेचा प्रश्न असतो.
मराठी भाषा आणि तिचा अपमान
हा माणूस ज्या पद्धतीने मराठी भाषा बोलतो, ते ऐकले की मनात प्रश्न उभा राहतो
खरंच मराठी भाषा अभिजात आहे का?
जर मराठी ही अभिजात भाषा असेल, तर मग तिचा वापर इतक्या हलगर्जीपणे, इतक्या अहंकाराने का केला जातो?
मराठी ही फक्त निवडणुकीपुरतीची भाषा आहे का?
की केवळ दिखाव्यासाठी वापरायची एक राजकीय साधन आहे?
लोढा कुटुंबाचा उदय आणि राजकीय आश्रय
लोढा यांच्या वडिलांनी नालासोपारा परिसरात ‘लोढा पार्क’ उभारत बिल्डरकीमध्ये करिअर केले. हे काही अचानक घडलेले नव्हते.
त्यामागे राजकीय आश्रय होता शरद पवारांचा.
याच काळात भाजपाने “भूखंडाचे श्रीखंड” ही मोहीम आखली होती. ती का आखली गेली होती?
कारण जमिनी, भूखंड, रिअल इस्टेट या क्षेत्रात जे काही चालले होते, ते सर्वसामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर जात होते.
शरद पवार आणि न उलगडलेले कोडे
मला आजही एक प्रश्न सतावत राहतो
मा. शरद पवारांनी कायम भिकारी असलेल्या गुजराती लोकांना मोठं का केलं?
त्यांना उद्योगपती का बनवलं?
महाराष्ट्रात एकही मराठी माणूस नव्हता का उद्योगपती करण्यासाठी?
की महाराष्ट्रात उभी राहिलेली सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच हा अट्टाहास होता?
सहकाराच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, सामान्य माणूस ताकदवान होत होता.
पण त्याच वेळी,
शेटजी-भटजी संस्कृतीला हळूच डोळा मारला जात होता.
शेतकरी, कामगार यांच्या नावाने भाषणं करायची आणि प्रत्यक्षात शोषण करणाऱ्या शेटजीला पाठीशी घालायचं हा दुटप्पीपणा महाराष्ट्राने जवळून पाहिला आहे.
बाळासाहेबांचा इशारा आणि आजची परिस्थिती
बाळासाहेब ठाकरे फार आधीच म्हणाले होते —
“ही कमळी संसार आमच्याशी थाटते आणि डोळा शरद बांबूंना मारते.”
आज त्या वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आहे.
मुंबई आणि मराठी माणसाच्या मुळावर उठलेली जी विषवल्ली आज फोफावत आहे, ती कालच पेरली गेली होती.
आणि दुर्दैव म्हणजे —
ती विषवल्ली ज्यांनी पेरली, त्याचे परिणाम आज मराठी माणूस भोगतो आहे.
मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही.
ती मराठी माणसाची ओळख आहे, संघर्षाची कहाणी आहे आणि स्वाभिमानाची निशाणी आहे.
धर्माच्या नावावर निवडणुका जिंकता येतील,
पण मराठी माणसाचा विश्वास, त्याची भाषा आणि त्याचा हक्क गमावून सत्ता फार काळ टिकत नाही.
आज गरज आहे ती स्पष्ट विचारांची, प्रामाणिक भूमिकेची आणि मराठी माणसाच्या बाजूने उभे राहण्याची.
नाहीतर इतिहास एक दिवस प्रश्न विचारेल
मुंबई हातातून गेली तेव्हा तुम्ही नेमकं काय करत होतात?



