पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज पार्टी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, कारण याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्याच्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडिओ आहे. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती, असा आरोप होत आहे.
एल थ्री लेजर लाऊंज या हॉटेलमधील हा प्रकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हॉटेलमध्ये खासगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथे हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. एल थ्री हॉटेलवर पोलीस आणि एक्साईज विभागाकडून कारवाई सुरू आहे. तसंच हॉटेल मालक आणि पार्टी आयोजक यांचीही चौकशी करण्यात येत आहे.