इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वर नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे जगभरातून टीका होत असतानाच आता आपल्या नवीन पॉलिसीबाबत कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्यामुळे मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असा दावाही कंपनीने केला आहे.
आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत तुमचे खासगी मेसेज सुरक्षित ठेवले जातील. व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने ट्विटरद्वारे दिले आहे. याबाबत कंपनीने दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस अकाऊंटसाठी असल्याचा दावा कंपनीने पहिल्यांदा स्पष्टीकरण देतानाही केला होता.