पत्रकारानं आणि मीडियानं जबाबदार विरोधकाच्या भूमिकेतच राहावं, हा अलिखित संकेत #ArnabGoswami यांनी फक्त महाराष्ट्रापुरता पाळायचा ठरवला, तेव्हाच त्यांचं राजकीय नेत्यात रुपांतर झालं होतं. त्यामुळं, त्यांना पत्रकार म्हणून अटक केली, असं मानून शोक करून घ्यायची गरज वाटत नाही. मीडियावर हल्ला वगैरेही म्हणावंसं वाटत नाही.
तासभर पोलिसांनी दारात थांबून अर्णब गोस्वामींना बाहेर येण्याची विनंती केली. तासभर पोलिसांना दारात उभं ठेवण्यात शहाणपणा होता. कारण, ‘India’ सकाळी सातलाच जागा होणार होता. तोपर्यंत कॅमेरा, अँगल, सोशल मीडिया ट्रेंड तयार करायलाही हाताशी वेळ होता. हे सगळं ‘मीडियामन’पेक्षा स्टंटबाज ‘मीडलमन’ नेत्याचं वर्तन.
महाराष्ट्रात निखील वागळे, कुमार केतकर यांनी वेळोवेळी राजकीय पक्षांविरुद्ध भूमिका घेतल्या होत्या; त्या व्यक्तिसापेक्ष नव्हत्या. त्यांच्यावर कार्यकर्त्यांकरवी हल्ले झाले. ते मीडियावरचे हल्ले जरूर होते. कारण, वागळे-केतकर यांनी मीडियानं करायचं ते काम केलं होतं. सुडबुद्धी न ठेवता टिका केली होती.
गोस्वामींनी आणलेला पत्रकारितेतला कल्ट कोणत्याही पक्षाच्या अधिकृत मुखपत्रांमध्ये असतो, त्यापेक्षा जहाल आहे. असा जहाल पक्षवादी कल्ट पत्रकारीतेच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रयोग गोस्वामींनी केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. त्यासाठी, पत्रकार म्हणून जे करायचं नाही, ते सगळं गोस्वामींनी केलं.
तरीही त्यांना पत्रकार मानून अटकेचा निषेध करायचा, तर फार मोठं लोकविलक्षण धाडस लागेल; जे पक्षवादी कल्ट पत्रकारितेतच असू शकतं.
प्रेक्षक, नागरीक म्हणून आपल्याला आपल्या राजकीय भूमिकांचं स्वातंत्र्य असतं. मीडिया नावाचा संस्थात्मक घटक म्हणून काम करताना मात्र राजकीय सुडबुद्धीविरहीत जबाबदार विरोधकाचीच भूमिका हवी.