पुणे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 700 पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचंही ते म्हणाले. त्याचवेळी या प्रकरणाचा कसून तपास सुरु असून पुणे पोलिसांची बदनामी करू नये अशा शब्दांत, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खडसावलंय. मोटरसायकलवर तिघा आरोपींना पाहिल्याबाबतची माहिती स्थानिकाकडून मिळाल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ताब्यात घेतलेला एक जण पुण्यातील उंड्री परिसरातील आहे. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर एकावर बलात्काराचा गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच तिघेही परप्रांतीय असून, गुन्ह्यापूर्वी ते बियर प्याल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
आरोपी शोधण्याच्या कामात सीसीटीव्ही आधारित तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होणार आहे. आरोपीने चेहरा लपवला तरी यंत्रणेला दिलेल्या फीडच्या आधारावर त्याचा शोध घेतला जात असल्याचं पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं. एका स्थानिक व्यक्तीकडून मोटार सायकलवर तिघांना पाहिल्याची माहिती मिळाली. घाटामध्ये मोबाईलला नेटवर्क नाही, तसंच सीसीटीव्ही नाह त्यामुळे तपासात अडचणी येत होत्या, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं. एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी अतिशय सराईत असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. कोणताच पुरावा मागे ठेवायचा नाही अशा पद्धतीने गुन्हा केला. तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा उघडकीस आणला. या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर एका सीसीटीव्हीत आरोपी कैद झाले. हे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागलं. येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्या आधारवर पोलिसांनी आरोपींचं स्केच जारी केलं आणि नागरिकांना ते आरोपींना माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आता एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.