Tuesday, March 3, 2026
HomeMain Newsजल जीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम –...

जल जीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी ९० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम – याशनी नागराजन,

ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि पुरेसे पिण्याचे पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद साताऱ्याने ९० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम आखला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

१५ ऑगस्ट २०१९ रोजी भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन सुरक्षित पाणीपुरवठा करणे हे आहे. यासाठी पाणीपुरवठा योजनांची आखणी पुढील ३० वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रगती

सातारा जिल्ह्यात जल जीवन मिशनची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असून एकूण १६१० योजनांपैकी १११२ योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत, तर ४९८ योजना प्रगतीपथावर आहेत.

जिल्ह्यातील एकूण ६,१८,२७७ घरांपैकी ५,७३,१६८ घरांना नळ जोडणी देण्यात आली असून ४५,१०९ घरांना जोडणी देणे बाकी आहे. ज्या योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

९० दिवसांच्या कार्यक्रमातील प्रमुख बाबी

  • शून्य टक्के प्रगती असलेल्या योजना तात्काळ सुरू करणे
  • मुदत संपलेल्या योजनांना आवश्यक ती मुदतवाढ मिळवणे
  • १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उर्वरित नळजोडण्या पूर्ण करणे
  • ‘हर घर जल’ उद्दिष्ट साध्य करणे
  • पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करणे
  • सुधारित प्रस्ताव शासन/DLTC कडे सादर करणे
  • आदिवासी कुटुंबांतील प्रत्येक घराला नळजोडणी देणे
  • अंतिम व चालू देयके वेळेत सादर करणे
  • त्रयस्थ तांत्रिक तपासणी वेळेत पूर्ण करणे
  • सोलर पंप प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देणे
  • पाणीटंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करणे

अडचणींच्या निराकरणासाठी संयुक्त पाहणी

योजनेतील अडथळे दूर करण्यासाठी गटविकास अधिकारी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संयुक्त पाहणी करणार आहेत. विहीर किंवा उंच पाण्याची टाकी यासाठी जागेची उपलब्धता, विविध विभागांची परवानगी, तसेच गावपातळीवरील समस्या यावर तालुका स्तरावर सुनावणी घेऊन निर्णय करण्यात येणार आहेत.

गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रश्न सुटले नाहीत तर मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर सुनावणी घेऊन सर्व अडचणींचे निराकरण करण्यात येईल, असे नागराजन यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून निर्धारित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments