चीन मध्ये करोना बॉम्ब फुटला असताना जपान, द.कोरिया, हॉंगकॉंग, तैवान आणि आता अमेरिकेत सुद्धा करोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याची गंभीर दखल भारत सरकारने घेतली आहे. करोनाने जागतिक पातळीवर धोक्याची घंटा वाजविली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करोनाचे नवे व्हेरीयंट ट्रॅक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. कुठल्याही ठिकाणी करोना टेस्ट पॉझीटिव्ह आलेली असले तर त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्ससाठी आयजीएसएलएस प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया बुधवारी सर्व राज्य सचिवांची बैठक घेत आहेत.
आरोग्य विभागाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात करोना केस मध्ये नवीन व्हेरीयंट असू शकते त्यामुळे जीनोम सिक्वेन्सिंग आवश्यक असल्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन व्हेरीयंट असले तर त्यावर वेळीच फैलाव होऊ नये म्हणून उपाययोजना करणे शक्य होणार आहे. चीन आणि अन्य देशात ओमिक्रोनच्या बीएफ. ७ या व्हेरीयंटने थैमान घातले असून जागतिक आरोग्य संघटनेने हे व्हेरीयंट अतिशय वेगाने पसरणारे असल्याचे जाहीर केले आहे. भारतात सध्या सरासरी १०० करोना केस येत आहेत.