Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकौटुंबिक हिंसाचाराचा मुलांवर होणारा परिणाम

कौटुंबिक हिंसाचाराचा मुलांवर होणारा परिणाम

कौटुंबिक हिंसाचाराचा मुलांच्या वर्तणूकीत काय बदल होतात, त्यांच्या दैनंदिन व सामाजिक आयुष्यात काय बदल होतात हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन स्त्री मुक्ती संघटनेने नुकतेच अभ्यास संशोधन केले.

अभ्यासासाठी २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत स्त्री मुक्ती संघटनेच्या

भारतात महिलांवर होणारे हिंसाचार हे आता नवीन राहिलेले नाही, आपण रोज वर्तमानपत्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या बातम्या वाचत असतो. महिलांवर होणारे अत्याचार हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यात प्रामुख्याने कुटुंबात होणारे अत्याचार हे कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतात. पूर्वी हुंड्याच्या नावाखाली महिलांना होणारी शारीरिक मारहाण आणि त्या अनुषंगाने होणारे अत्याचार इथपर्यंत कुटुंबात होणार्‍या हिंसेकडे पहिले जायचे परंतु स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला संघटना यांनी सातत्याने केलेल्या संघर्षामुळे २००५ साली केंद्र सरकारने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा बनवला. या कायद्याच्या अंतर्गत पीडित महिलेची व्याख्या खूप विस्तारीत स्वरुपात मांडली आहे. निव्वळ लग्न झालेली महिलाच नव्हे तर अशा सर्व स्त्रिया ज्या कौटुंबिक संबंधात रहात आहेत किंवा कुणावर अवलंबून राहात आहेत त्या सर्व महिलांना या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्यात आले आहे.

स्त्री मुक्ती संघटना १९७५ सालापासून स्वयंसेवी संघटना म्हणून महाराष्ट्रात, देशात व जागतिक पातळीवर कार्यरत आहे. कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्र हा स्त्री मुक्ती संघटनेच्या अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे. पीडित महिलेला आपल्या व्यथा, दु:ख, आपल्यावर होणारा हिंसाचार व्यक्त करण्यासाठी कुणीतरी हवे असते ज्यामुळे मन मोकळे होते, मनात आणि घरात कोंडलेले दुःख हलके होते, संवादामुळे मनाच्या जखमा भरायला मदत होते म्हणून १९८५ साली स्त्री मुक्ती संघटनेने कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्र सुरू केले.

कौटुंबिक सल्ला आणि समुपदेशनचे काम करत असताना, कौटुंबिक हिंसाचाराचा परिणाम हा निव्वळ त्या महिलेवर होत नसून तिच्या संपूर्ण कुटुंबावर, त्या कुटुंबातील मुलांवर आणि एकूणच समाजावरही होतो हे प्रकर्षाने जाणवले. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे दाखल करताना महिलांसोबत येणार्‍या त्यांच्या मुलांकडे पहिले तर ही मुले अतिशय घाबरलेली आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेली जाणवली. यातून कौटुंबिक हिंसाचाराचा या मुलांवर नक्की परिणाम होत असेल आणि त्यांचे आयुष्य नक्कीच विस्कळीत होत असणार हे प्राथमिक निरीक्षणातून जाणवले.

मुलांचे अधिकार लक्षात घेता या हिंसाचारामुळे मुलांच्या अधिकारांचे उल्लंघनही होताना दिसले. त्यामुळे घरात होणार्‍या कौटुंबिक हिंसाचाराचा मुलांच्या एकूणच शारीरिक, मानसिक आणि भावनिक वर्तणूकीत काय बदल होतात, त्यांच्या दैनंदिन व सामाजिक आयुष्यात नेमके काय बदल होतात हे लक्षात घेऊन त्याबाबत काही ठोस उपाययोजना करता येऊ शकतील का हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास संशोधन करण्याचे स्त्री मुक्ती संघटनेने ठरविले.

या अभ्यासासाठी २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत स्त्री मुक्ती संघटनेच्या परळ, चेंबूर व वाशी येथील कौटुंबिक सल्ला व समुपदेशन केंद्रात दाखल असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणातील ११ ते १७ वयोगटातील ६५ मुलांशी संवाद साधून, प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा करण्यासाठी निवड केली गेली. त्याच प्रमाणे केंद्रात (FCC) दाखल असलेल्या प्रकरणांचा अभ्यास करून माहिती घेतली. कौटुंबिक हिंसाचार पीडित कुटुंबातील मुलांसोबत काही वेळ व्यतीत करून, संवाद साधून, प्रत्यक्षरित्या विचारपूस करून मिळवलेल्या महितीद्वारे आढावा घेतला गेला.

६५ किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेतल्या. या किशोरवयीन मुलांचे सरासरी वय १४.५ वर्ष होते. यापैकी, ३५ मुलगे आणि ३० मुली होत्या. मुलाखतीच्या वेळी या मुलांपैकी बऱ्याच मुलांची नावे शाळेत नोंदवलेली होती तर, तीन मुलांना घरी होणाऱ्या हिंसाचारामुळे शाळा सोडावी लागली होती. कौटुंबिक हिंसेमुळे किशोरवयीन मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येतो असे आढळले. अर्ध्याहून कमी मुलांना नियमितपणे शाळेत जाता येते आणि २३% मुलांना एका महिन्यात तीन दिवस शाळा बुडवावी लागत आहे.

अधिकांश मुले ही घरात होणार्‍या हिंसाचाराच्या घटनेत हस्तक्षेप करतात उदा. मारहाणीपासून आपला किवा पीडित व्यक्तीचा बचाव करणे, बचावासाठी इतरांकडून मदत मागणे इ. तर काही मुले ही अशा वेळेस काहीच करू शकत नसल्याची कबुली दिली. हिंसेमुळे त्वरित घरातून बाहेर पडावे लागले किवा जीवाला धोका असण्याची परिस्थिति निर्माण झाली तर अनेक मुलांनी सुरक्षित ठिकाण उपलब्ध आहे असे संगितले.

कौटुंबिक हिंसाचाराचा जवळ जवळ सर्वच मुलांवर मानसिक परिणाम होत असल्याचे दिसून आले. जसे की सततची डोकेदुखी, वाईट स्वप्ने पडणे, भूक न लागणे, सतत भीती वाटणे इत्यादि परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काहींना तर आत्महत्येचे विचार सतावत असल्याचेही दिसून आले. ६२% मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नसल्याचे म्हटले.

अशा हिंसक वातावरणात वाढत असलेल्या मुलांना अनेक प्रकारच्या मदतीची गरज असते. काही किशोरवयीन मुलांनी समुपदेशन, मानसिक आधार, शिक्षण पूर्ण करण्यासाठी व रोजगार मिळविण्यासाठी मदत मागितली.

या अभ्यासातील निष्कर्षावरून, स्त्री मुक्ती संघटनेने ‘जिज्ञासा’ हा हस्तक्षेप करणारा प्रकल्प राबविण्याचे ठरवले. जिज्ञासा म्हणजे उत्सुकता. टीमने किशोरवयीन मुलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढविणे, व्यवसाय मार्गदर्शन करणे, कौटुंबिक हिंसा पीडित महिलांसाठी पालकत्व प्रशिक्षण सत्र आयोजित करणे आणि किशोरवयीन मुलांसाठी वस्तीत रिसोर्स सेंटर स्थापन करणे या विषयी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments