Sunday, August 10, 2025
HomeMain Newsकिरीट सोमय्या पाणचट माणूस, कुणीही भागीदारी करु शकतो, कुठलीही चौकशी करा :...

किरीट सोमय्या पाणचट माणूस, कुणीही भागीदारी करु शकतो, कुठलीही चौकशी करा : रवींद्र वायकर

“कुठूनही कोणीही जमिनी घेऊ शकतो. अर्णव प्रकरणातून लक्ष हटवण्यासाठी हे नाटक सुरु आहे. किरीट सोमय्या पाणचट माणूस आहे. जमीन व्यव्हाराबाबत सगळीकडे नोंद आहे. लोकआयुक्तांनी चौकशी केलेली आहे. त्यामुळे आरोप करण्यात काहीही तथ्य नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी दिली

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी मिळून नाईक कुटुंबीयांकडून जमीन घेतली आहे. ठाकरे आणि वायकर यांनी मिळून अशाप्रकारची भरपूर जमीन घेतली आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर रवींद्र वायकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली

“किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना मी घणाघाती आरोप म्हणणार नाही. हे फाल्तू आरोप आहेत. कुणी कुणाकडून जमीन घेऊ शकत नाही का? हा माझा पहिला प्रश्न आहे. जमीन घेतलेली आहे. त्याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दाखवली आहे. इन्कम टॅक्समध्ये त्याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे जमीन घेतली आणि त्याची माहिती लपवून राहिली, असा प्रश्नच येत नाही. जमीन घेतलेली आहे”, असं वायकर म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचा संबंध नाही. माझा संबंध होता म्हणून त्याला मारलं का तुम्ही? अन्वय नाईक किंवा माझे अनेक जणांशी संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार आहात का? या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करायची नाही का? चौकशी होऊ द्यायची ना”, असंदेखील ते म्हणाले.

“जमीन व्यव्हाराची माहिती निवडणूक आयोगापासून इन्कम टॅक्सला दिलेली आहे. विशेष म्हणजे लोकआयुक्तांनादेखील याबाबत माहिती दिली आहे. ज्यावेळेला संजय निरुपम यांनी आरोप केले होते, त्यावेळेला त्यांच्यासमोर ते आलं होतं”, असं स्पष्टीकरण त्यानी दिलं.

“ठाकरे आणि वायकर कुटुंब एकत्र व्यव्हार का करु शकत नाहीत? उद्धव ठाकरे माझे नेते आहेत. तुम्ही चौकशी करा आम्ही किती जमीन एकत्र घेतली आहे. त्याबाबत इन्कम टॅक्सला माहिती दिली आहे. आता त्याची माहिती सोमय्यांना द्यायला हवी का?”, असा सवाल वायकर यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी नेमके काय आरोप केले?

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments