महात्मा जोतिराव फुले यांनी भारतीय समाजाला दिलेले सर्वात क्रांतिकारी योगदान कोणते असेल, तर ते म्हणजे बहुजन समाजातील, विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा पाया. शिक्षण ही केवळ अक्षरओळख नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी हत्यार आहे, हे जोतिरावांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी पेशवाईनंतरही अधिक क्रूर स्वरूपात टिकून असलेल्या जातिभेद, स्त्रीद्वेष आणि धार्मिक अंधश्रद्धांच्या विरोधात थेट शिक्षणाच्या रणांगणात उडी घेतली.
१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात सुरू झालेली पहिली मुलींची शाळा हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नव्हता, तर ती पुरोहितशाहीविरोधातील थेट बंडाची घोषणा होती. त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत, म्हणजे १८५२ पर्यंत, जोतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल अठरा मुलींच्या शाळा सुरू केल्या. हा वेग, ही जिद्द आणि ही दूरदृष्टी त्या काळाच्या मानाने केवळ क्रांतिकारीच नव्हे, तर धाडसी होती.
या अठरा शाळांपैकी चौथी शाळा ५ डिसेंबर १८४८ रोजी ओतूर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे सुरू झाली, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. पुण्यात भिडेवाडा, महारवाडा आणि हडपसर येथे शाळा सुरू केल्यानंतर थेट ग्रामीण भागात, तेही पुण्यापासून दूर असलेल्या ओतूरसारख्या गावात मुलींची शाळा उभारणे म्हणजे तत्कालीन सामाजिक व्यवस्थेला दिलेले उघड आव्हान होते.
ही शाळा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्वतः सुरू केली. केवळ नावापुरती नव्हे, तर प्रत्यक्ष शिक्षिका म्हणून त्या महिनाभर ओतूरमध्ये राहिल्या. पुण्यात शिक्षिका म्हणून काम करताना ज्यांना भटबामणांच्या गलिच्छ अपमानाला, शेण-चिखलाच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले, तीच स्त्री अधिक कठीण परिस्थितीत, ग्रामीण भागात नवी शाळा उभारण्यासाठी सज्ज होते—ही गोष्ट जागतिक पातळीवरही दुर्मिळ म्हणावी लागेल.
या ऐतिहासिक कार्यामागे भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. जोतिरावांचे परममित्र, सहकारी आणि सत्यशोधक चळवळीचे प्रवर्तक असलेल्या भाऊ पाटलांनी केवळ नैतिक पाठिंबा दिला नाही, तर शाळेची इमारत स्वतः बांधली, सावित्रीबाईंना आश्रय दिला आणि आयुष्यभर या कार्याशी निष्ठा ठेवली. त्यांच्या वडिलांनी, कोंडाजी रामजी डुंबरे पाटील यांनी सावित्रीबाईंना मुलीसमान मानले, ही बाब त्या काळातील सामाजिक क्रांतीची खोली दाखवते.
त्या काळी पुण्याहून ओतूरला येणे म्हणजे आजच्या मोजमापाने सुमारे शेसव्वाशे किलोमीटरचा, नद्या ओलांडणारा, बैलगाडीतून केलेला कठीण प्रवास. एका स्त्रीने असा प्रवास करून गावात राहणे, शाळा चालवणे आणि जातीय व्यवस्थेला आव्हान देणे—हे कल्पनातीत धैर्याचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे, या लढ्यात कुणबी/शेतकरी म्हणजेच मराठा समाजातील लोक ठामपणे पुढे आले. ते केवळ सहानुभूती दाखवून थांबले नाहीत, तर हे आपले जिवितकार्य मानून शेवटपर्यंत फुल्यांच्या सोबत उभे राहिले.
ओतूर-जुन्नर परिसरात सत्यशोधक चळवळ अत्यंत प्रभावी होती. येथे होणाऱ्या सत्यशोधक सभांना नारायण मेघाजी लोखंडे, ‘दीनबंधू’ कार यांसारखे नेते उपस्थित राहत असत आणि दोन ते तीन हजार श्रोते या सभांना हजर असत. या सभांनंतर भटबामणांशिवाय, सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले जात. याच पार्श्वभूमीवर बाळाजी कुसाजी पाटील यांच्या दोन मुलींच्या विवाहामुळे चिडलेल्या पुरोहितवर्गाने १८८४ साली जुन्नर कोर्टात दावा दाखल केला. तब्बल सहा वर्षे चाललेला हा खटला शेवटी सत्यशोधकांच्या बाजूने लागला—हा न्यायालयीन लढाही सामाजिक परिवर्तनाचाच भाग होता.
या संघर्षावर जोतिरावांनी लिहिलेली कविता ओतूर परिसरातील सत्यशोधक आंदोलनाची तीव्रता स्पष्ट करते. धर्मग्रंथ, शंकराचार्य, पत्रांतील हायहाय—सगळे अस्त्र वापरूनही पुरोहितशाही अपयशी ठरली, हे या कवितेतून दिसते.
१८७६ च्या दुष्काळात सावित्रीबाईंनी कोंडाजी पाटील डुंबरे यांच्यासोबत ओतूरमध्ये धान्यवाटप केले. प्लेगच्या साथीमध्येही त्या अंदाजे दोन महिने येथे राहून रुग्णांची सेवा करत होत्या. शिक्षण, समाजसुधारणा आणि मानवी सेवा—ही त्रिसूत्री सावित्रीबाईंच्या कार्यात स्पष्टपणे दिसते.
आज, महात्मा फुले जयंतीनिमित्त ओतूर येथील ही शाळा पाहिली असता समाधान वाटते. भिडेवाड्यातील पहिली शाळा दुरवस्थेत असताना, ओतूरची शाळा मात्र सुस्थितीत, जतन केलेली आणि आजही कार्यरत आहे. आजही येथे मुलींचीच शाळा भरते आणि २८३ मुली येथे शिक्षण घेत आहेत. हा जिवंत वारसा ओतूरकर ग्रामस्थांनी जपला आहे, यासाठी त्यांचे आणि शाळेच्या शिक्षकांचे मनापासून कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
महात्मा फुले, सावित्रीबाई, कोंडाजी व भाऊ डुंबरे पाटील यांचे धैर्य आजही आपल्याला प्रश्न विचारते—आजच्या काळात, विचारांसाठी, परिवर्तनासाठी, एकमेकांसाठी आपण किती ठामपणे उभे राहतो? काळ जहर बनून उभा असताना, मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. सत्यशोधक परंपरेचा वारसदार म्हणून, एकमेकांच्या पाठीशी न उभे राहण्यास आपल्याकडे आता कोणतेच कारण उरलेले नाही.
ओतूरची शाळा ही केवळ एक इमारत नाही, तर ती क्रांतीची साक्ष, संघर्षाची आठवण आणि भविष्याची दिशा आहे.



